Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IMD Rain Alert: मुंबईत अतितीव्र मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार, शहराला आजही रेड अलर्ट; इतर जिल्ह्यांमध्ये कशी असणार स्थिती?

IMD Rain Alert: मुंबईत अतितीव्र मुसळधार पाऊस धुमाकूळ घालणार, शहराला आजही रेड अलर्ट; इतर जिल्ह्यांमध्ये कशी असणार स्थिती?

. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार शनिवारी महामुंबईकरांनी अतितीव्र मुसळधार पावसाचा धुमाकूळ अनुभवला. रविवारीही महामुंबई परिसरात हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

महामुंबईला रविवारी रेड अलर्ट कायम असून सोमवारी पालघर आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईसाठी रविवारपर्यंत रेड अलर्ट असून सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाण्यात सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडेल. मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना यलो अलर्ट असून मंगळवारी दिवसभरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. रायगड जिल्ह्यात मात्र मंगळवारीही ऑरेंज अलर्ट आहे. तर बुधवारी महामुंबई परिसरात मध्यम सरींची शक्यता आहे. दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरीला रविवारी आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून त्यानंतर पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकेल. सिंधुदुर्गात रविवारपासून चारही दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

रविवारी घाटमाथ्यावर पावसाचा फटका बसू शकेल. पुणे घाट परिसरात रविवारी आणि सोमवारी रेड अलर्ट असून काही ठिकाणी अतिमुसळधार तर तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा घाट परिसरात रविवारी रेड अलर्ट आहे. तर नाशिक घाट परिसरात रविवार आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यभरात पावसाचा जोर, कुठे-कशी आहे स्थिती?

शनिवारी कोसळलेल्या पावसामुळे मुंबईत पडझडीच्या अनेक घटना घडल्या. संततधारेमुळे भांडुपमध्ये शास्त्री मार्गावर सुरू असलेल्या खासगी बांधकामालगतचा रस्ता खचला. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास स्व. मीनाताई ठाकरे फूल मार्केटमध्ये मोठे झाड कोसळले. यामध्ये ७० ते ८० गाळ्यांचे नुकसान झाले. नवी मुंबईत पांडवकडा धबधब्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर बोईसर येथे सहा वर्षांचा मुलगा नाल्यात वाहून गेला. याशिवाय मुंबई परिसरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडणे, झाड वाकणे, झाडे पडणे अशा घटना घडल्या.

पुणे शहर आणि जिल्ह्यात घाटमाथ्यावरही जोरदार पाऊस झाला. शहरात हंगामातील पहिला भीजपाऊस पडला आहे. शहरात शुक्रवारी मध्यरात्री ते सकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता. दुपारी सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. विभागात ५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात मोसमी पावसाचा जोर वाढलेला असताना मराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांपासून मध्यम ते हलक्या सरी कोसळत आहेत. जुलैच्या पहिल्या आठवड्यातही जेमतेम पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात भीजपाऊस झाला आहे. शुक्रवारी रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता.

शनिवारी सकाळी साडेआठपर्यंत शहरात ५.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती चिकलठाणा वेधशाळेने दिली आहे. रिमझिम पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्यास पाणी वाहून जाण्याची शक्यता असते. रिमझिम पावसामुळे पाणी जमिनीत मुरण्यास वाव असतो, असे भूजल अभ्यासकांनी सांगितले. पावसामुळे वाहतूक काही प्रमाणात संथ झाली होती. खड्डे पडलेल्या रस्त्यातून वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. सातारा परिसरातील आमदार रस्त्यावर खड्ड्यात मुरुम टाकण्यात आला होता. पाऊस पडल्यानंतर मुरुम भिजून सर्वत्र चिखल झाला आहे. या निसरड्या रस्त्यावर वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे, असे रहिवाशांनी सांगितले. दुपारी तीननंतर जोरदार पाऊस झाला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जालना ३.१, बीड ४.९, लातूर ३.६, धाराशिव ३, नांदेड ११, परभणी ३.९ आणि हिंगोली ३.८ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे. विभागात एकूण ५.६ मिमी पाऊस झाला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत सरासरी १३४ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना अवघा ११३ मिमी पाऊस झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims