Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
IND vs SL : भारताचा विजय हिरावून घेणारा श्रीलंकन फलंदाज कोण? BCCI उपाध्यक्षांकडून थेट सचिनशी तुलना, काय म्हणाले?

IND vs SL : भारताचा विजय हिरावून घेणारा श्रीलंकन फलंदाज कोण? BCCI उपाध्यक्षांकडून थेट सचिनशी तुलना, काय म्हणाले?

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एका श्रीलंकन फलंदाजाने भारतीय गोलंदाजांना अक्षरशः रडकुंडीला आणलेले पाहायला मिळाले. या फलंदाजाचे नाव आहे सोनल दिनुशा.

या संपूर्ण मालिकेत दिनुशाने धावांचा असा काही पाऊस पाडला आहे की, स्वतः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हेदेखील त्याची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी या युवा फलंदाजाची तुलना थेट क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी केल्याने सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोनलच्या खेळीनेच दुसरा सामना भारताला जिंकता आला नाही. हा सामना आता 'ड्रॉ' झाला आहे.

सोनल दिनुशाचा टीम इंडियाविरुद्ध कहर

सोनल दिनुषा सध्या आपल्या कसोटी कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण त्याने भारतीय संघाविरुद्ध ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, ते पाहता त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत सोनलने पहिल्या डावात दणदणीत शतक झळकावले होते, तर दुसऱ्या डावात ८४ धावांची शानदार खेळी केली होती. त्याचा हा फॉर्म कोलंबो कसोटीतही कायम राहिला. कोलंबोमध्येही त्याने पहिल्या डावात शतक आणि आता दुसऱ्या डावातही १३३धावा केल्या. म्हणजेच या मालिकेतील चारही डावांत त्याने ५० पेक्षा जास्त धावा कुटून भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला आहे.

राजीव शुक्लांकडून थेट सचिनशी तुलना

भारतीय गोलंदाजांविरुद्ध सोनल दिनुशाची ही आक्रमक आणि संयमी फलंदाजी पाहून बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला स्वतःला रोखू शकले नाहीत. मालिका संपण्यापूर्वीच त्यांनी एक्सवर (X) पोस्ट करत दिनुशावर स्तुतिसुमने उधळली आहेत. त्यांनी लिहिले आहे, "श्रीलंकेचा हा फलंदाज सोनल दिनुशाएक अत्यंत उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याची फलंदाजी पाहून सचिन तेंडुलकरची आठवण येते. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक महान कसोटीपटू बनू शकतो." बीसीसीआयच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याने अशी थेट तुलना केल्याने दिनुशाच्या टॅलेंटची सध्या क्रिकेट जगतात जोरदार चर्चा सुरू आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटीचा निकाल

भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोलंबो येथील एसएससी मैदानावर खेळला गेला. या सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला आहे. तथापि, भारताने पहिला सामना जिंकल्यामुळे मालिका १-० ने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताला सामना जिंकण्याची संधी होती, परंतु भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेच्या दुसऱ्या डावातील उर्वरित ४ विकेट्स घेता आल्या नाहीत. त्यांनी ४२९ धावा करून २०० हून अधिक धावांची आघाडी घेतली होती. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलो-ऑन दिला होता. त्यामुळे यजमान श्रीलंकन संघासाठी या सामन्याचा निकाल विजयापेक्षा कमी नाही.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims