मुंबई : महिला आशिया चषक २०२६ मधील थायलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या. सुरुवातीला स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली.
मात्र, त्यानंतर भारतीय डावाला मोठी गळती लागली. शेवटच्या सात विकेट्स भारताने अवघ्या २९ धावांच्या अंतरात गमावल्या. त्यामुळे एकवेळ मोठी धावसंख्या उभारण्याच्या स्थितीत असलेला भारतीय संघ १५९ धावांवर थांबला.
मानधनाचं रनआउट, प्रतिकाला संधी
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताला स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र, १९ धावांवर मंधाना धावबाद झाली. जेमिमा रॉड्रिग्ज दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नसल्याने प्रतिका रावलला टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. प्रतिकाने शेफालीसोबत डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला.शेफालीचं शानदार अर्धशतक
शेफाली वर्माने मात्र आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला. तिने अवघ्या २६ चेंडूंमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील १९वे अर्धशतक पूर्ण केले. तिच्या फटकेबाजीमुळे भारत मोठी धावसंख्या उभारेल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, शेफाली बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजीची लय अचानक बिघडली.शेवटच्या ७ विकेट्स २९ धावांत
मधल्या फळीत भारतीय फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. विकेट्सची मालिका सुरू झाल्यानंतर भारताला वेगाने धावा करता आल्या नाहीत. अखेरच्या सात विकेट्स भारताने फक्त २९ धावांच्या आत गमावल्या. त्यामुळे १७० ते १८० धावांच्या आसपास जाण्याची शक्यता असलेला भारतीय संघ १५९ धावांवरच थांबला.थायलंडसमोर १६० धावांचं लक्ष्य
थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नियमित कर्णधार नन्नापत कोंचारोएनकाई दुखापतीमुळे संघात नसल्याने थिपचा पुट्टावोंगकडे नेतृत्वाची जबाबदारी आहे. आता भारताच्या गोलंदाजांवर १५९ धावांच्या आत विरोधी टीमला रोखण्याची जबाबदारी असेल. टी-२० क्रिकेटमधील अलीकडच्या निराशाजनक कामगिरीनंतर हरमनप्रीत कौरच्या संघासाठी या सामन्यात विजय मिळवणे महत्त्वाचे आहे.
