Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Jainam Jain: बेबी बॉस! 14 व्या वर्षी कंपनी सुरू, बुर्ज खलिफात ऑफिस; जैनमचा कारनामा पाहून भलेभले थक्क

Jainam Jain: बेबी बॉस! 14 व्या वर्षी कंपनी सुरू, बुर्ज खलिफात ऑफिस; जैनमचा कारनामा पाहून भलेभले थक्क

दुबई: ज्या वयात मुलांना दहावीच्या परीक्षेचं टेन्शन असतं, त्याच वयात एका मुलानं दुबईत ऑफिस थाटलं आहे. बुर्ज खलिफाच्या १४१ मजल्यावर बसून १४ वर्षांचा मुलगा व्यवसाय करत आहे. हे सगळं वाचताना थोडं अजब वाटलं असेल.

पण १४ वर्षांच्या जैनम जैनचा कारनामा पाहून भलेभले थक्क झाले आहेत. जगातील सर्वात उंच इमारतीत अवघ्या १४ व्या वर्षी जैनमनं कार्यालय थाटलं आहे. जैनमनं आर्टिफिशियल इंटेलिजिन्स स्टार्टअप उभं केलं आहे. तो दुबईतील सर्वात तरुण एआय संस्थापक आहे.

जैनम जैन नेमका कोण?
जैनम जैन दुबईतील सर्वात कमी वयाचा एआय संस्थापक आहे. जैनम TEDx स्पीकरदेखील आहे. त्याच्या नावावर दोन पेटंट आहेत. या सोबतच त्यानं एक पुस्तकदेखील आहे. तब्बल १,४५,००० पेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असलेली यूट्यूब कम्युनिटीदेखील त्यानं तयार केली आहे.

वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी जैनमनं उद्योग क्षेत्रातील पहिला धडा गिरवला. तेव्हा जैनमचे वडील त्याला पहिल्यांदा बिझनेस मीटिंगला घेऊन गेले. याच अनुभवानं त्याच्या मनात व्यवसायाबद्दल कुतूहल निर्माण झालं. हळूहळू ते वाढत गेलं. त्यानं स्वत:ला केवळ शिक्षणापुरतं मर्यादित न ठेवता लोकांना भेटण्यास, व्यावसायिक कार्यक्रमांना जाण्यास सुरुवात केली. नवे अनुभव घेतले आणि व्यवसाय कसे चालतात, याची माहिती मिळवली.

जैनमनं तेराव्या वर्षी १०५ दिवसांच्या आत ICSE मधून इयत्ता दहावीची परीक्षा दिली. यानंतर त्यानं एक वेगळा मार्ग धरला आणि व्यवसायावर लक्ष केंद्रीत केलं. मँगो इंजिन नावानं एआय स्टार्ट अप सुरू केलं. कंपन्यांना मार्केटिंगपासून न्यूजलेटरपर्यंतच्या सेवा तो पुरवतो. कस्टमर एंगेजमेंट, सेल्स, कंटेट क्रिएशन या सगळ्या गोष्टी ऑटोमेट करण्यात जैनमची कंपनी मदत करते. त्यानं तयार केलेला प्लॅटफॉर्म सध्या बिटा स्टेजला आहे. अनेक व्यावसायिक त्याच्या वापरासाठी प्रतीक्षा करत आहेत.

वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यानं स्वत:ला विविध आव्हानं देण्यास सुरुवात केली. ही आव्हानं ५० दिवसांसाठी असायची. त्यात ५० पुस्तकं वाचणं, ५० नेटवर्किंग इव्हेंट्समध्ये जाणं, ६ किलोमीटर प्रवास करून उद्योगपतींना भेटणं, त्यांच्याकडून शिकणं, अशी विविध आव्हानं त्यानं स्वीकारली. कुतूहलामुळेच इथवर आल्याचं जैनम सांगतो. केवळ शिक्षण महत्त्वाचं नाही, त्या जोडीला प्रत्यक्षातले अनुभव जास्त महत्त्वाचं असल्याचं म्हणत जैनमनं त्याच्या यशाचं गुपित सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims