जळगाव : 'हॅपी रक्षाबंधन ताई...सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको', असा मेसेज बहिणीला शेअर करून एका 18 वर्षीय भावानं रक्षाबंधनाच्या दिवशीच आपलं आयुष्य संपवल्याची मन हेलावून टाकणारी घटना जळगावमध्ये घडली आहे.
तसंच, 'अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा', असं स्टेटस देखील या भावाने ठेवलं होतं. धक्कादायक म्हणजे, ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरल्याचा मित्राला व्हिडीओद्वारे निरोप दिल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावमधील जुना आसोदा रोड परिसरात ही घटना घडली आहे. रोहित साहेबराव धनगर, असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. बहिणीकडून राखी बांधल्यानंतर घरी आल्यावर रोहितनं आत्महत्या केली. रोहित हा अकरावी कला शाखेत शिकत होता. रक्षाबंधनासाठी वडिलांसोबत रोहित आत्याच्या घरी गेला होता. तिथे त्याने बहिणीकडून राखी बांधल्यानंतर वडिलांची दुचाकी घेऊन घरी आला. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर बहिणीसोबतचा फोटो ठेवून, 'सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको, मी जातो', असा भावनिक मेसेज केला.मेसेज पाहून मित्रांची रोहितच्या घरी धाव
तसेच ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरल्याचं सांगणारा व्हिडीओ मित्राला पाठवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मेसेज पाहून मित्रांनी रोहितच्या घरी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याने गळफास घेतला होता. कुटुंबीयांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केलं; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.'अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा'
दरम्यान, रोहितनं आणखी एक स्टेटस ठेवले होतं. त्यात 'अगली बार आऊंगा तो सबका मनपसंद बनके आऊंगा', 'जो दाग रह गये उन्हे मिटाके आऊंगा, ना मेरी आखे नम होगी, ना दिल मे कोई ले के आऊंगा! शुक्रिया...,' असं म्हटलं होतं. घरच्या मुलानं इतक्या टोकाचं पाऊल उचल्यामुळे धनगर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रोहितने जर घरी असं काही सांगितलं असतं तर मदत केली असती, असं म्हणत कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.
