म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: कनिष्ठ महाविद्यालयांच्या संचमान्यतेचे निकष बदलल्याने राज्यातील तब्बल १० हजार शिक्षकांची पदे कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेली ५० वर्षे लागू असलेले निकष कोणताही स्वतंत्र शासनादेश किंवा परिपत्रक न काढता बदलण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केला आहे.
नवे निकष रद्द करून प्रचलित नियम कायम ठेवावेत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, या मागणीसाठी महासंघाने आंदोलनाचे हत्यार उपसले असून, ४ सप्टेंबरला शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यभरातून अडीच ते तीन हजार शिक्षक मोर्चात सहभागी होणार असल्याचा दावा महासंघाने केला आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६च्या संचमान्यतेत विद्यार्थ्यांची संख्या, तासिकेचा कालावधी, विज्ञानाच्या प्रात्यक्षिकांच्या तुकड्यांतील विद्यार्थीसंख्या, तसेच आदिवासी आणि डोंगराळ भागांतील तुकडी मंजुरीचे निकष बदलण्यात आल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. परिणामी, काही कायम शिक्षक अतिरिक्त ठरले असून, तात्पुरत्या सेवेतील शिक्षक आणि शिक्षण सेवकांच्या सेवांवरही गदा आली आहे.
Teachers Day 2026: शिक्षकांचा गौरव आणि डॉ. राधाकृष्णन यांची जयंती! ५ सप्टेंबरलाच का साजरा होतो शिक्षक दिन? वाचा महत्त्व अन् पुरस्कार सोहळा
'शिक्षणमंत्री, अधिकारी, सचिव, आयुक्त आणि संचालकांकडे निवेदने देऊनही तोडगा निघालेला नाही. प्रचलित नियम लागू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि शिक्षकांच्या सेवा सुरक्षित ठेवाव्यात. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल', असा इशारा महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी दिला आहे.
तासिका ४५ ऐवजी ४० मिनिटांची
वरिष्ठ महाविद्यालयांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांत तासिका ४५ मिनिटांची असताना ऑनलाइन संचमान्यतेत ती ४० मिनिटांची करण्यात आली आहे. ४५ मिनिटांची तासिका ठेवण्याची शिफारस समितीने केल्याचा दावा महासंघाने केला आहे. तासिका कमी केल्याने शिक्षकसंख्या आणि विद्यार्थ्यांचा अध्ययन कालावधीही घटत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.MBBS, BDS Cut Off Marks: 'एमबीबीएस'चा कट ऑफ ५३८, तर 'बीडीएस' ४९३ गुण! पहिल्या फेरीची यादी जाहीर; जाणून घ्या प्रवेशाचा अंतिम मुहूर्त
आदिवासी भागांत ५० विद्यार्थ्यांचा निकष
आदिवासी, डोंगराळ भागांत पूर्वी ३० विद्यार्थ्यांसाठी तुकडी मंजूर होत होती. आता ५० विद्यार्थ्यांचा निकष लावल्याने ३० ते ५० विद्यार्थी असलेल्या अनेक महाविद्यालयांना तुकडी मिळत नसल्याचे महासंघाने म्हटले आहे. यामुळे सुमारे ७०० ते ८०० शिक्षकांची पदे कमी झाल्याचा दावा आहे. मुलींच्या तुकडीसाठी १५ विद्यार्थिनींची अनुदान सवलत आणि कमी विद्यार्थीसंख्येच्या तुकड्यांना दंड आकारून मंजुरी देण्याची तरतूदही नव्या निकषांत नसल्याचे महासंघाने सांगितले. पूर्णवेळ शिक्षकांचा कार्यभार १७ तासांवरून १७ तास २० मिनिटे, तर अर्धवेळ शिक्षकांचा कार्यभारही वाढवण्यात आला आहे.
