बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्यांनी राजीनामा दिला आहे. लोकभवनात जाऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. कर्नाटकच्या राज्यपालांचे विशेष सचिव प्रभु शंकर यांनी सिद्धारमय्यांनी राजीनामा दिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
सध्या राज्यपाल शहरात नाहीत. ते परत आल्यावर राजीनामा स्वीकारतील, अशी माहिती विशेष सचिवांकडून देण्यात आली.
सिद्धारमय्या यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असलेले डी. के. शिवकुमार लवकरच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. सिद्धारमय्या यांच्यासारख्या बलाढ्य नेत्यानं मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गेल्या काही दिवसांत कर्नाटकच्या राजकारणात घडलेला घटनाक्रम चकित करुन टाकणारा आहे.
कर्नाटकात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या सिद्धारमय्या यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील ३ वर्षे गेल्याच आठवड्यात पूर्ण झाली. दलित आणि अल्पसंख्यांक समाजात त्यांचा उत्तम जनाधार आहे. पण त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील कारभारावर पक्ष नेतृत्व फारसं समाधानी नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. राज्यात सरकारविरोधी वातावरण वाढू लागलं होतं. त्याचा फटका पुढील निवडणुकीत पक्षाला बसण्याचा अंदाज होता.
भाजप नेतृत्त्व अनेक राज्यांमध्ये सरकारविरोधात वातावरण तयार होत असल्याची जाणीव होताच मुख्यमंत्री बदलतं. तोच फॉर्म्युला आता काँग्रेसनं वापरला आहे. ७८ वर्षीय सिद्धारमय्या यांची प्रशासनावरील पकड ढिली होत असल्याचं लक्षात येताच काँग्रेसनं त्यांना पायउतार होण्याच्या सूचना दिल्या.
सिद्धारमय्या यांच्या जागी डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रिपदी निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात २०२३ मध्ये काँग्रेसनं विधानसभा निवडणूक लढवली आणि २२४ पैकी १३६ जागा जिंकल्या. त्यावेळी शिवकुमार प्रदेशाध्यक्ष होते. मोठ्या विजयानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी अनुभवी सिद्धारमय्या यांच्यावर विश्वास दाखवला. तेव्हा जवळपास १०० आमदार सिद्धारमय्या यांच्या बाजूनं होतं.
काँग्रेस नेतृत्त्वानं शिवकुमार यांना २०२३ मध्ये उपमुख्यमंत्रिपद दिलं आणि प्रतीक्षा करण्याच्या सूचना केल्याचं त्यांचे समर्थक सांगतात. अडीच वर्षांसाठी तुम्हाला मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द नेतृत्त्वानं दिला होता, असाही शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे. गेल्याच आठवड्यात सिद्धारमय्या यांनी मुख्यमंत्रिपदी ३ वर्षे पूर्ण केली. यानंतर आज त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

