Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
KBC 18:रोजंदारी करणाऱ्या कामगाराच्या लेकानं जिंकले २५ लाख, वाशिमच्या  तरुणाचा गेम पाहून अमिताभ बच्चनही थक्क

KBC 18:रोजंदारी करणाऱ्या कामगाराच्या लेकानं जिंकले २५ लाख, वाशिमच्या तरुणाचा गेम पाहून अमिताभ बच्चनही थक्क

मुंबई: छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' अर्थात KBC च्या १८ व्या पर्वाची दणक्यात सुरुवात झाली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आपल्या भारदस्त आवाजात "देवी आणि सज्जनांनो..." म्हणत हॉटसीटवर बसणाऱ्या स्पर्धकांसह कोट्यवधी प्रेक्षकांचं स्वागत करत आहेत.

यंदाच्या १८ व्या पर्वातही देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सामान्य नागरिक, खेळाडू आणि तरुण अभ्यासक आपली स्वप्ने घेऊन हॉटसीटवर बसताना दिसत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भागांमध्ये अनेक स्पर्धकांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर मोठी रक्कम जिंकून इतिहास रचलाय. तर विशाल प्रेमचंद राठोड या रोजंदारीवर काम करणाऱ्या एका कामगारानं आपल्या ज्ञानाच्या जोरावर तब्बल २५ लाखांची रक्कम जिंकली आहे.

KBC च्या मंचावर नुकताच एक अत्यंत भावुक आणि प्रेरणादायी क्षण पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विशाल प्रेमचंद राठोड या रोजंदारी कामगाराच्या मुलानं आपल्या ज्ञानाच्या जोरावर हॉटसीटवर बसून २५ लाख रुपयांची मोठी रक्कम जिंकली आहे. मात्र, कोणतीही लाईफलाईन शिल्लक नसल्यानं ५० लाखांच्या प्रश्नावर कोणताही धोका न पत्करता त्यांनी खेळ सोडण्याचा योग्य निर्णय घेतला.

विशाल राठोड यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. ते आणि त्यांचे वडील दोघेही दररोज कामाच्या शोधात घराबाहेर पडतात आणि रोजंदारीवर ५०० ते ६०० रुपये कमावण्यासाठी राबतात. कित्येक दिवस तर काम न मिळाल्यानं रिकाम्या हातानं घरी परतावं लागतं. त्यांची आई सफाई कामगार म्हणून काम करते. या तुटपुंज्या उत्पन्नातून त्यांना दरमहा ७,००० रुपये घरभाडेही भरावं लागतं, असं त्यांनी सांगितलं.

विशाल गेल्या तीन वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत, पण पुस्तके आणि परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठीही पैसे नसल्यानं त्यांचा रोजचा हा संघर्ष सुरूच होता. अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसलेल्या विशाल यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीनं सर्वांनाच अवाक केलं. अत्यंत शांत डोक्यानं आणि हुशारीनं प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी एकेक टप्पा पार केला आणि २५ लाख रुपयांच्या टप्प्यापर्यंत मजल मारली. या प्रवासात त्यांनी त्यांच्या सर्व लाईफलाईन्सचा उत्तम वापर केला.

काय होता ५० लाख रुपयांचा प्रश्न?

अमिताभ बच्चन यांनी विशाल यांच्यासमोर ५० लाख रुपयांसाठी पुढील कठीण प्रश्न ठेवला होता.

प्रश्न: १९५३ मध्ये नंगा पर्वत शिखरावर पोहोचणारे पहिले व्यक्ती कोण होते, जेव्हा त्यांचे सहकारी शिखराआधीच थांबले आणि त्यांनी एकट्यानेच चढाई पूर्ण केली?

पर्याय:A) विली मर्कलB) कार्ल एम हेरलिगकॉफरC) हरमन बूल D) राइनहोल्ड मेस्नर

या प्रश्नाचे उत्तर देताना विशाल यांच्याकडं कोणतीही लाईफलाईन उरली नव्हती. चुकून चुकीचं उत्तर दिले असतं तर ते थेट ५ लाख रुपयांवर खाली आले असते. त्यामुळं अचूक उत्तर माहिती नसल्यानं त्यांनी कोणतीही घाई न करता २५ लाख रुपये जिंकून खेळ सोडण्याचा सुरक्षित मार्ग निवडला. या प्रश्नाचं अचूक उत्तर हे C) हरमन बूल असं होतं.

विशाल यांच्या या निर्णयाचं सूत्रसंचालकअमिताभ बच्चनयांनी भरभरून कौतुक केलं. जेव्हा विचार बदलतात, तेव्हा नशीबही बदलतं, अशा शब्दांत बिग बी यांनी विशाल यांच्या धैर्याचं कौतुक केलं. तसंच, विशालच्या वडिलांनी मुलाला कायमस्वरूपी नोकरी मिळण्यासाठी केलेलं आवाहन पाहून अमिताभ यांनीही प्रेक्षकांना विशालला रोजगाराची संधी देण्याचे आवाहन केलं. विशाल यांनी जिंकलेली २५ लाखांची रक्कम त्यांच्या कुटुंबाला दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्या एमपीएससीच्या स्वप्नाला नवी दिशा देण्यासाठी मोलाची ठरणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims