Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
KDMC News: स्वीपिंग मशीन ठरतेय महापालिकेसाठी अडचण; १४ स्वच्छता यंत्रांनी करायचे कोणते काम , 'स्वच्छते'चंच ओझं

KDMC News: स्वीपिंग मशीन ठरतेय महापालिकेसाठी अडचण; १४ स्वच्छता यंत्रांनी करायचे कोणते काम , 'स्वच्छते'चंच ओझं

.टा.वृत्तसेवा ,कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेने मागील वर्षी शासकीय निधीतून चार पॉवर स्वीपर मशीन खरेदी केल्या. या यंत्रांच्या सहाय्याने 'अ', 'ब' आणि 'क' प्रभागांत स्वच्छता केली जात आहे.

तर, स्वच्छतेचे कंत्राट दिलेल्या कंपनीकडून चार पॉवर स्वीपर उर्वरित सात प्रभागांतील रस्ते स्वच्छ करतात.

स्वच्छ भारत मिशन आणि सहा स्वीपिंग मशीन

आता मात्र राज्य सरकारने 'स्वच्छ भारत मिशन'मधून खरेदी केलेल्या सहा स्वीपिंग मशीन महापालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे १४ स्वच्छता यंत्रांनी नेमके कोणते रस्ते साफ करायचे, त्या चालवण्यासाठी चालक आणि इतर कर्मचारी आणायचे कोठून, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

डीप क्लिनिंग मोहीम सुरू

रस्त्यावरील धूळ झाडून आणि धुऊन स्वच्छ करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत डीप क्लिनिंग मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेत रस्त्यावरील कचरा झाडून काढल्यानंतर पॉवर मशीनच्या मदतीने धूळ गोळा करून रस्ते धूळमुक्त करण्यास सुरुवात करण्यात आली.

कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली

यानंतर राज्य सरकारकडून डीप क्लिनिंगसाठी पॉवर मशीन खरेदी करण्याचे आदेश महापालिकांना देण्यात आले होते. या आदेशाचे पालन करत महापालिका प्रशासनाने चार स्वीपिंग मशीन खरेदी केल्या. याच दरम्यान महापालिकेच्या कल्याण पूर्व, ग्रामीण भाग आणि डोंबिवली अशा सात प्रभागांतील कचरा उचलण्यासाठी मे. सुमित एल्को प्लास्ट या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली.

महापालिकेला प्रत्येकी सहा स्वीपिंग मशीन

या कंत्राटदाराने कचरा वाहून नेण्यासाठी गाड्या खरेदी करण्याऐवजी चार पॉवर स्वीपर स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरवल्या. त्यामुळे महापालिकेच्या पॉवर स्वीपर केवळ तीन प्रभागांतच चालवल्या जात आहेत. त्यातच आता राज्य सरकारने या मोहिमेतून खरेदी केलेल्या स्वीपिंग मशीनमधून प्रत्येक महापालिकेला प्रत्येकी सहा स्वीपिंग मशीन दिल्या आहेत.

प्रशासनापुढे प्रश्न निर्माण

सध्या शहरातील अनेक रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर यंत्राद्वारे स्वच्छता करणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळेच शहरातील एकूण रस्त्यांची लांबी पाहता १४ पॉवर स्वीपर नेमक्या कोठे चालवायच्या, असा प्रश्न प्रशासनापुढे निर्माण झाला आहे.

मनुष्यबळाची कमतरता

सध्या या नव्या कोऱ्या स्वीपिंग मशीन खंबाळपाडा आगारात घंटागाड्यांबरोबर उभ्या आहेत. आधीच चालक आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असताना या गाड्यांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करणे हेही प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दरम्यान याबाबत घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारने महापालिकेला सहा स्वीपिंग मशीन पाठवल्या आहेत. सध्या त्या आगारात उभ्या असून,त्यांचीआरटीओकडे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या रस्ते सफाईसाठी वापरण्याबाबत नियोजन केले जाईल.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims