25 वर्षीय व्यावसायिक केतन अग्रवाल याचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचंही काल शनिवारी पुण्यात उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झालं. नातवाच्या अकाली आणि क्रूर हत्येचा धक्का सहन न झाल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती समोर आली आहे.
वडिलांसाठी मुलाची भावनिक पोस्ट
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवर 'मिस यू डॅड' अशी भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि नातेवाईकांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवीचंद अग्रवाल हे बऱ्याच दिवसापासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हृदयाशी संबंधित एक मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली होती.मात्र, शस्त्रक्रियेनंतर प्रकृती सुधारत असतानाच, 18 जून रोजी त्यांचा लाडका नातू केतन अग्रवाल याची लोहगड किल्ल्यावर फिरायला गेलेले असताना हत्या करण्यात आली. नातू केतनच्या या हत्येच्या बातमीनं आजोबा देवीचंद अग्रवाल यांना प्रचंड मोठा मानसिक धक्का बसल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे.प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
नातवाच्या मृत्यूच्या अतीव दुःखामुळे आणि धक्क्यामुळे देवीचंद अग्रवाल यांची प्रकृती अचानक अधिक खालावली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुण्याच्या एका नामांकित खासगी रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यानं त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एकाच महिन्यात तरुण मुलगा आणि घरातील ज्येष्ठ छत्र हरपल्यामुळे अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.लोहगड किल्ल्यावरुन ढकलून हत्या
पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक केतन अग्रवाल याचा 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी, पोलिसांच्या सखोल तपासात ही पूर्वनियोजित हत्या असल्याचं समोर आलं. केतनची होणारी होणारी पत्नी सिया गोयल (वय 20) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (वय 22) यांनी मिळून नोव्हेंबरमध्ये होणारा विवाह मोडण्यासाठी केतनला किल्ल्यावरून ढकलून दिल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.