Dailyhunt
Kolhapur News: बंधाऱ्यात बुडून पुजारी अरुण गुरव यांचा मृत्यू; तब्बल 48 तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाली बॉडी

Kolhapur News: बंधाऱ्यात बुडून पुजारी अरुण गुरव यांचा मृत्यू; तब्बल 48 तासांच्या प्रयत्नांनंतर मिळाली बॉडी

साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: चैत्र यात्रेनिमित्त ज्योतिबा डोंगरावर दर्शन घेऊन गावी परतत असताना दुर्गमानवाड येथील विठ्ठलाई देवी मंदिराचे पुजारी अरुण धोंडिराम गुरव (वय 38, रा. दुर्गमानवाड, ता.

राधानगरी) यांचा पंचगंगा नदीपात्रात शिंगणापूर बंधाऱ्यावर बुडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर 48 तासांच्या सतत शोधमोहिमेनंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्यांचा मृतदेह शोधून काढला. या घटनेमुळे दुर्गमानवाडसह परिसरात शोककळा पसरली असून, नातेवाईकांना धीर देण्याचे काम सुरू आहे.

ज्योतिबा दर्शनानंतर घडला अपघात
दुर्गमानवाड येथील विठ्ठलै देवी मंदिराचे प्रमुख पुजारी म्हणून ओळखले जाणारे अरुण गुरव हे चैत्र यात्रेच्या निमित्ताने बुधवारी श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर गेले होते. तेथे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी रात्री बहिणीकडे मुक्काम केला. गुरुवारी सकाळी मित्रासह कारने गावाकडे परतताना साडेसातच्या सुमारास शिंगणापूर बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीपात्रात ते अंघोळ करण्यासाठी उतरले. बंधाऱ्याच्या पूर्व बाजूला नदीत उडी मारल्यानंतर गतिमान प्रवाह आणि पात्राच्या विस्तारामुळे पाण्याची खोली आणि वेग याचा त्यांना अंदाज आला नाही. पोहत ते बऱ्याच अंतरावर गेले, मात्र माघारी परतताना प्रचंड दमछाक होऊन ते गटांगळ्या खाऊ लागले.

वाचवण्याचे नागरिकांचे प्रयत्न अपयशी
अरुण गुरव यांना पाण्यात बुडताना पाहताच काठावरील नागरिकांनी आरडाओरड सुरू करून तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचवण्यासाठी टायर ट्यूब आणि इतर साधने भिरकावली, मात्र ते पकडण्यात गुरव यांना अपयश आले. खोल पाण्यात ते पूर्णपणे बुडाले. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्यातील पोलिस, तलाठी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

48 तासांनी मृतदेह शोधून काढला
शुक्रवारी सकाळी पुन्हा जोरदार शोधमोहीम सुरू करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदीपात्रात सतत सर्च ऑपरेशन चालू ठेवले आणि दुपारी 12 वाजता अरुण गुरव यांचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश मिळवले. शिंगणापूर घाटावर नातेवाईकांसह शेकडो लोकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवला. तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अरुण गुरव यांच्या अपघाती मृत्यूमुळे दुर्गमानवाड गाव शोकात बुडाले असून, विठ्ठलाई देवी मंदिरातील धार्मिक कार्येही काही काळ बंद ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे पंचगंगा नदीपात्रातील शिंगणापूर बंधाऱ्याजवळील प्रवाहाची तीव्रता आणि अनोळखी ठिकाणी अंघोळीचे धोके पुन्हा समोर आले आहेत. प्रशासनाने यापुढे संकेतस्थळी फलक, सतर्कता जाहीर आणि रेस्क्यू पथकाची तैनाती वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. यात्रेसारख्या काळात भाविकांची वर्दळ वाढत असते, त्यामुळे अशावेळी नदीकाठच्या भागात विशेष काळजी घेणे गरजेचे ठरते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims