Dailyhunt
Latur Crime : 'अटक होणार नाही, केसमध्ये मदत करणार'; पीआयनेच खाकीला डाग लावला, लाखोंच्या बदल्यात गुन्हेगारीला अभय, एसीबीने रंगेहात पकडलं

Latur Crime : 'अटक होणार नाही, केसमध्ये मदत करणार'; पीआयनेच खाकीला डाग लावला, लाखोंच्या बदल्यात गुन्हेगारीला अभय, एसीबीने रंगेहात पकडलं

षिकेश होळीकर, लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी एका गुन्ह्यातील आरोपीस अटक न करण्यासाठी ३ लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

या अनुषंगाने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात पोलीस निरीक्षक पुजारी यांच्यासाठी पोलीस हवालदार राहुल नागरगोजे हे ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

आरोपीला अटक न करण्यासाठी घेतले पैसे

तक्रारदाराचे मेव्हणे रणजित मल्हारी पाटील यांच्या विरुद्ध दि. ३१ मार्च २०२६ रोजी उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यातील आरोपीस अटक न करण्यासाठी व तपासात इतर मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी व हवालदार नागरगोजे यांनी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. आरोपी पोलीस हवालदार नागरगोजे यांनी आरोपी पो. नि. पुजारी यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे पंचासमक्ष ५० हजार रुपये लाचेची मागणी केली.

एसीबीकडून सापळा कार्यवाही आजमावली असता शहरातील अहमदपूर रोडवरील हॉटेल पंचवटी येथे ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच स्विकारल्यानंतर हवालदार नागरगोजे यांनी तक्रारदार यांच्या समक्ष पोलीस निरीक्षक फोन करून तक्रारदार त्यांना भेटल्याची माहिती दिली. आरोपींनी लाच स्वीकारल्यानंतर एसीबीने पुजारी व हवालदार नागरगोजे यांना तात्काळ ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. नागरगोजे यांच्या अंगझडतीमध्ये मोबाईल हँडसेट व लाचेची रक्कम ४५ हजार रुपये मिळून आली. तर आरोपी लोकसेवक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या अंगझडतीमध्ये एक मोबाईल हँडसेट मिळून आला आहे.

पुजारी यांच्याच ठाण्यातून घेतले ताब्यात

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. एसीबीने पुजारी यांना त्यांच्या कार्यालयातूनच ताब्यात घेतले. तर थेट लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेऊन चौकशी करण्यात आली. त्यांच्या घरांची घरझडती घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

उदगीर ग्रामीण व शहर पोलीस ठाण्यात खळबळ

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी व उदगीर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार राहुल नागरगोजे यांना लाच स्वीकारताना एसीबीने यशस्वी सापळा लावून दुपारी २:३० वाजताच्या सुमारास ताब्यात घेऊन लातूर येथे घेऊन गेले. ही बातमी समजल्यानंतर उदगीर शहर व पोलीस ठाण्यात खळबळ उडाली होती.

उदगीर ग्रामीण पोलिसात पोलीस निरीक्षक पुजारी व हवालदार नागरगोजे यांच्याविरुद्ध कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. एसीबी चे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कारवाई करण्यात आली. तर अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims