मुंबई टाइम्स टीमरंगभूमीवर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांशी थेट संवाद 'साधणारी अभिनेत्री लीना भागवत हिला काही काळासाठी रंगमंचापासून दूर राहावं लागत आहे. सातत्यानं हाऊसफुल्ल होत असलेल्या 'आमने सामने' नाटकाच्या प्रयोगांदरम्यान तिच्या आवाजावर ताण येऊ लागला.
डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून, पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला तिला देण्यात आला आहे, त्यामुळे 'आमने सामने' च्या प्रयोगांमधून तिनं तात्पुरती विश्रांती घेतली आहे.
माझ्या पात्राला दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही
कलाकाराच्या दृष्टीनं आवाजाचं महत्त्व अधोरेखित करताना लीना भावगत सांगते, 'आता पुढचे काही दिवस 'कसं वाटलं नाटक ?' असं म्हणता येणार नाही. हेच कशाला काहीच बोलता येणार नाही. गेले काही दिवस फक्त एकच गाणं आठवतंय, 'मेरी आवाज ही पेहचान है...'. एका कलाकारासाठी त्याचा आवाज हीच खरी त्याची ताकद असते. मागच्या वर्षीपासून 'आमने सामने' चे प्रयोग लागोपाठ हाऊसफुल्ल होत आहेत. प्रयोग बघताना जेवढी मजा तुम्हाला येते, तेवढीच मजा आम्ही कलाकारसुद्धा करतो. 'आमने सामने' मधल्या माझ्या पात्राला दिलेलं प्रेम मी कधीच विसरू शकणार नाही. पण गेले काही महिने आवाजावर ताण यायला सुरुवात झाली होती. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग करू लागले, पण शेवटी डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली.
'पेहचान' टिकवायची असेल तर एक छोटी प्रोसिजर करावीच लागेल आणि अखेर प्रोसिजर पार पडली'. या काळात डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम, मंगेश कदम आणि नाटकाची टीम आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याचंही लीना हिनं नमूद केलं.
लवकरच नव्या 'भूमिकेत'
लीना भागवत लवकरच एका नव्या आणि अनपेक्षित भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 'आमने सामने' या गाजलेल्या नाटकातून रसिकांची मनं जिंकणारी लीना आता रंगभूमीवर आणखी एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. मात्र यावेळी ती केवळ अभिनेत्री म्हणून नाही, तर एक वेगळीच जबाबदारी पार पाडताना दिसणार असल्याची चर्चा आहे. हे नवं नाटक नेमकं काय आहे? आणि त्यात लीनाची नवी भूमिका कोणती? याचा उलगडा होण्याआधीच नाट्यप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता सर्वांच्या नजरा या नव्या घोषणेकडे लागल्या आहेत." आता काही दिवस आवाजाला विश्रांती देतेय. थोड्या दिवसांनी अजून ताकदीनं उभी राहिन आणि पुन्हा म्हणेन, 'कसं वाटलं नाटक ?' तोपर्यंत एक छोटंसं मध्यंतर... लवकरच भेटू 'आमने सामने'!"
-लीना भागवत

