नागपूर : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सामान्य नागरिक त्रस्त असताना केंद्रातील भाजप सरकार धार्मिक ध्रुवीकरण आणि इव्हेंटबाजीच्या माध्यमातून जनतेचे लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर तसेच इंधन तुटवड्याच्या परिस्थितीवर तीव्र टीका केली.
वडेट्टीवार म्हणाले की, "येत्या दीड महिन्यात पेट्रोलचे दर १७० रुपये तर डिझेलचे दर १५० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. ज्या पद्धतीने देश चालवला जात आहे, त्यावरून देश आर्थिक खड्ड्यात जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी आणि सामान्य माणूस पूर्णपणे भरडला जात आहे. सरकार जनतेला वाचवण्यासाठी नाही तर मारण्यासाठीच आले आहे. जर इंधनाचा तुटवडा नाही, असे सरकार आणि भाजप नेते सांगत असतील, तर काही ठिकाणी आरसी बुक पाहून डिझेल का दिले जात आहे? शेतकरी शेतीसाठी ट्रॅक्टर वापरतो, त्यालाही आरसी बुक दाखवावे लागत असेल तर परिस्थिती गंभीर आहे, हे मान्य करावे लागेल," असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
देशात आगामी काळात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही देत विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, लोकांनी सध्या असलेले पैसे सुरक्षित ठेवावेत. फार मोठ्या गुंतवणुका करू नयेत. भविष्यात आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकते. बँकांची परिस्थिती चिंताजनक आहे. रिझर्व्ह बँकेचाही पैसा सरकार स्वतःच्या मालकीचा असल्यासारखा वापरत आहे, असा दावाही त्यांनी केला.
मराठा आरक्षणावरून सरकारवर हल्लाबोल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, "जरांगे पाटील वारंवार आंदोलन करत आहे. वाटण्याच्या अक्षदा लावण्याचं काम झालं आहे. जीआर काढायचा पण अंमलबजावणी करायची नाही. त्यांचा विषय घेऊन ते लढत आहेत. आमचा विषय घेऊन आम्ही लढू. आम्ही ओबीसींसाठी काही मागू तेव्हा काही बोलू नका आणि ते मराठ्याच मागत असतील तर आम्ही तेव्हा बोलणार नाही. सरकारची तिजोरी रिकामी झाली आहे. लूट केलेली आहे, कोणाला द्यायला काही शिल्लक राहिलेलं नाही," असंही वडेट्टीवार म्हणाले.

