मुंबई : यंदाच्या आयपीएल सीझनच्या पहिल्याच सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्स संघाने तीन विकेटने मात करत त्यांना धूळ चारली. स्पर्धेतील पहिलाच सामना गमावल्यानंतर कॅप्टन ऋषभ पंत आणि लखनौचे संघमालक संजीव गोयंका यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
यावरून सर्वांना आयपीएल २०२४ ची आठवण झाली. कारण त्यावेळी संघ सामना हरला होता आणि गोयंका मैदानावरच त्याला सुनावत होते. त्यावेळी क्रिकेट चाहत्यांनी गोयंका यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्यामुळे पंतसोबतही तसेच घडल्याचा अंदाज बांधून गोयंकांना ट्रोल केलं जात आहे. अशातच स्वत: संजीव गोयंका यांनी एक पोस्ट केली आहे.
आयपीएल सीझन खूप मोठा असून अशा प्रकारचे क्षण हे काहीतरी अर्थपूर्ण उभारण्याच्या प्रक्रियेचा भाग असतात. मला कॅप्टन आणि संघावर पूर्ण विश्वास आहे की शानदार कमबॅक करतील. सर्व चाहत्यांचे मनापासून धन्यवाद. आपला संघ आणखी ताकदीने कमबॅक करेल आणि या सीझनमधील पराक्रमाची स्टोरी अजून बाकी आहे, असं संजीव गोयंका यांनी म्हटलं आहे.
संजीव गोयंका यांचे सामना संपल्यावर फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. ज्यामध्ये संजीव गोयंका हे ऋषभ पंतसोबत काहीतरी बोलत असल्याचं दिसत आहेत. आता सामना संपल्यावर जर तो हरला असेल तर गोयंका यांचे हावभाव बऱ्यापैकी ते काय बोलत आहेत हे लक्षात येतात. जरी त्यांच्या हावभावावरून नाही लक्षात आलं तरी तिथे उभा असलेला कॅप्टन एकदम नाराज उभा असतो. त्यावरून प्रत्येकजण अंदाज बांधतो की नक्कीत ते सुनावत असतील. बुधवारी सामना झाल्यावर तेच घडलं आणि त्यांच्यावर टीका व्हायला लागली. मात्र आज सकाळीच त्यांनी एक्स पोस्टवर या पराभवानंतर खास पोस्ट केली आहे.
दरम्यान, लखनौने दिल्लीविरूद्धचा आपला पहिला सामना गमावला आहे. आता दुसरा सामना सनरायजर्स हैदराबादसोबत ५ एप्रिलला होणार आहे. या सामन्यामध्ये लखनौ काय नवीन स्ट्रॅटेजीसह उतरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

