Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Madhuri Pawar: हे भीतीदायक आहे,मला कोणाचंही नुकसान करायचं नाहीये, सत्य समोर यावं; माधुरी पवारने मागितली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मदत

Madhuri Pawar: हे भीतीदायक आहे,मला कोणाचंही नुकसान करायचं नाहीये, सत्य समोर यावं; माधुरी पवारने मागितली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे मदत

मुंबई: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार सोशल मीडियावरील ऑनलाईन ट्रोलिंग आणि आक्षेपार्ह कमेंट्समुळे संपातली आहे. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुरू असलेल्या घाणेरड्या कमेंट्स आणि सायबर छळवणुकीविरोधात माधुरीनं अखेर सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी कठोर कारवाईसाठी तिने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायाची हाक दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

माधुरी पवारनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत हा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आणला. एका महिला कलाकाराबद्दल वाचतानाही लाज वाटेल अशा भाषेत टिपण्या केल्या जात असून, यामुळं प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं माधुरीनं नमूद केलं. गेल्याच आठवड्यात तिनं या संदर्भात पोस्ट शेअर केली होती. आता तिनं याच मुद्द्यावर आणखी एक व्हिडिओ शेअर केलाय.

काय आहे माधुरी पवारची नवीन पोस्ट?

मला न्याय आणि सुरक्षिततेसाठी तुमच्या मदतीची गरज आहे…

गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर माझ्याबद्दल चुकीच्या आणि अपमानास्पद कमेंट्स करून मला सतत टार्गेट केलं जात आहे. माझी बदनामी करण्याचे प्रयत्न होत आहेत. माझं विकीपिडिया पेज देखील डिलीट करण्यात आलं आहे, आणि माझ्या सोशल मीडिया अकाउंट्सना हॅक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मला जाणवत आहे.

एक मुलगी म्हणून ही परिस्थिती माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक आणि भीतीदायक आहे. मी कोणाचंही नुकसान करू इच्छित नाही; मला फक्त सत्य समोर यावं, माझी प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपली जावी आणि या प्रकारामागे कोण आहे याची योग्य चौकशी व्हावी, एवढीच अपेक्षा आहे.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय सुनेत्रा पवार, आपण माझ्यासारख्या एका कलाकाराची व्यथा समजून घेऊन मला योग्य ती मदत आणि संरक्षण मिळवून द्यावं, ही मनापासून विनंती.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

या वाढत्या सायबर गुन्हेगारीची आणि महिला कलाकारांच्या सुरक्षेची गांभीर्यानं दखल घ्यावी, यासाठी माधुरी पवारनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे विशेष विनंती केली आहे. सोशल मीडियावर महिलांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांवर चाबूक उगारून आरोपींचा शोध घ्यावा आणि सायबर कायद्यान्वये कठोर कारवाई करावी, अशी मागणी तिनं केली आहे.

कलाकार आणि चाहत्यांचा पाठिंबा

माधुरीने ही आपबिती मांडल्यानंतर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आणि तिच्या चाहत्यांनी तिचं समर्थन केलं आहे. सध्या सायबर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून संशयित आयपी ॲड्रेस आणि फेक अकाऊंट्सचा शोध घेतला जात आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims