Dailyhunt
Maharashtra Day 2026: सर्वांगीण विकासात महाराष्ट्र अव्वल

Maharashtra Day 2026: सर्वांगीण विकासात महाराष्ट्र अव्वल

-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्यमहाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातील आणि जगभरातील मराठी बांधवांना मनापासून शुभेच्छा. आज कामगारदिनसुद्धा आहे, सर्व कामगार बंधू, भगिनींनाही मन:पूर्वक शुभेच्छा.

महाराष्ट्र केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेले राज्य नाही. महाराष्ट्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा समुच्चय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली स्वराज्याची प्रेरणा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला न्याय आणि प्रज्ञेचा पाया, संतांच्या अभंगवाणीचा दिव्य वारसा, महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पेटविलेली शिक्षण आणि समतेची मशाल, लोकमान्य टिळक यांनी जागविलेली राष्ट्रभावना, देशासाठी अनन्यसाधारण यातना सहन करण्याची ताकद देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्यांच्या विचारांचा एकत्रित संगम म्हणजे महाराष्ट्र. भौगोलिक रचनेत नाही, तर महाराष्ट्र धर्मातून महाराष्ट्र प्रकट होतो.

आपल्या सर्वांवर हा महाराष्ट्र धर्म जगभरात वर्धिष्णू करण्याची जबाबदारी आहे. यंदाचा महाराष्ट्र दिन विशेष आहे. हे वर्ष महात्मा जोतिराव फुले यांच्या २००व्या जयंतीचे आणि संत गाडगेमहाराज यांच्या १५० व्या जयंतीचे वर्ष आहे, चवदार तळ्याच्या ऐतिहासिक लढ्याचे शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष आपण समता आणि सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरे करतो आहोत. आज जग आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची झळ सोसत आहे. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने ऊर्जा सुरक्षेसाठी, पर्यायी तेल स्रोतांसाठी आणि सौरऊर्जेच्या विस्तारासाठी उभारलेल्या कामामुळे जगातील अन्य देशांना ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले, तसे भारतात झाले नाही.

जगातील ३० वी अर्थव्यवस्था

जगात कितीही आव्हाने असताना महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्र देशाच्या जीडीपीमध्ये १३.५ टक्क्यांहून अधिक योगदान देत आहे. २०२४-२५ मध्ये महाराष्ट्राने १,६४,८७५ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली. हे प्रमाण देशात आलेल्या एकूण 'एफडीए'च्या ३९ टक्के आहे. दावोसमधील 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'मध्ये महाराष्ट्राने ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले; ज्यातून ४० लाख रोजगार निर्माण होणार आहेत. जगात आर्थिक समस्या असताना महाराष्ट्राने जगातील ३०वी अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतली, हेच आपल्या राज्याचे सामर्थ्य आहे. हा विकास समतोल असावा, याचा विचार करून गडचिरोली, धुळे, नंदुरबार यांसारखी शहरेही गुंतवणुकीच्या नकाशावर आली आहेत. या वर्षी 'एल-निनो' परिस्थितीमुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आपला खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने, हा अंदाज गांभीर्याने घेतला पाहिजे. पेरणीची घाई करू नका. कृषी विभागाकडून येणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्या. त्यातून या संकटापासून बचाव सोपा जाईल. मला शेतकरी बांधवांना आश्वस्त करायचे आहे, की राज्य सरकार म्हणून आम्ही आधीपासूनच पाणी, चारा याचे नियोजन केले आहे. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामांना गती देऊन, त्यासाठी प्राधान्याने निधी देण्यास सांगण्यात आले आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करा. पाण्याची बचत हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. राज्यात खते आणि बियाण्यांची कोणतीही कमतरता नाही. लिंकिंग करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. घाबरू नका, सरकार तुमच्यासोबत आहे.

शेतकरी कर्जमाफी योजना
गेल्या वर्षी पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर १५,५७६ कोटी रुपये जमा केले गेले. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहेच. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाते; आता सौरऊर्जेचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. कितीही संकटे आली, तरी महाराष्ट्राच्या विकासाचा रथ थांबणार नाही. महाराष्ट्राला २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न आणि त्या दिशेने आपण आत्तापासूनच काम सुरू केले आहे.

वाढवण येथे चौथे मुंबई बंदर
महाराष्ट्र आज जगातही पायाभूत सुविधांच्या निर्मितीत आघाडीवर आहे. सध्या मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये १७३ किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका कार्यरत आहेत. दर वर्षी ५० किमीची मेट्रो सेवेत येईल, असे नियोजन आहे. 'समृद्धी'च्या साथीला 'शक्तिपीठ' येतो आहे. वाढवण येथे चौथे मुंबई बंदर विकसित केले जाणार आहे; जे जगातील 'टॉप टेन'पैकी असेल. आज महाराष्ट्र दिनी मला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील १३.३ किमीचा 'मिसिंग लिंक' प्रकल्प जनतेसाठी खुला होत आहे. यामुळे दोन शहरांमधील अंतर सुमारे सहा किमीने आणि प्रवासाचा वेळ २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार आहे. आमच्यासाठी विकास रस्ते आणि मेट्रोपुरता नाही; तर विकास म्हणजे प्रत्येक माणसाचे जीवन उंचावणे हा आहे.

४० लाखांहून अधिक महिला 'लखपती दीदी' झाल्या आहेत. ही संख्या या वर्षी ५० लाखांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. 'लाडकी बहीण योजने'तून बहिणींना मदत केली जाते. विविध घटकांसाठी ठोस योजना आहेत. सारथी, बार्टी, महाज्योती, आर्टी, वनार्टी, अमृत अशा संस्थांच्या माध्यमातून समावेशकतेची पायाभरणी केली जाते आहे.

उद्योजक आणि स्टार्टअप्सला सहाय्य
युवांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नवी मुंबईत आलेली सहा प्रसिद्ध जागतिक विद्यापीठे, आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटीसारख्या संस्था कौशल्यक्रांतीत भर घालणार आहेत. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'सारख्या क्षेत्रांत विस्तार केला आहे. महाराष्ट्राने स्टार्टअप, उद्योजकता आणि नावीन्यता धोरणाद्वारे पाच वर्षांत १.२५ लाख उद्योजक आणि ५० हजार स्टार्टअपना सहाय्याचे लक्ष्य ठेवले आहे. सुप्रशासनासाठी अनेक पावले उचलण्यात आली असून, सरकारच्या सर्व सेवा व्हॉट्सअ‍ॅपवर देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. गडचिरोली नक्षलमुक्त होऊन पोलाद शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी वेगाने पावले टाकते आहे. महाराष्ट्रातील ११ किल्ले 'युनेस्को' जागतिक वारसायादीत समाविष्ट झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची ही जगाने घेतलेली दखल आहे. महाराष्ट्र अधिक मजबूत आहे; आत्मनिर्भर आहे, महत्त्वाकांक्षी आहे. शेतकरी, कामगार, महिला, तरुण आणि उद्योजक प्रत्येकासाठी सरकारने कटिबद्धता सिद्ध केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विकसित भारत २०४७'च्या स्वप्नात महाराष्ट्र सर्वांत पुढे राहील, हे माझे महाराष्ट्र दिनी आपल्याला वचन आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims