Maharashtra MSBSHSE HSC Result 2026: राज्यातील शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन बुधवारी मागे घेतले. आंदोलन स्थगित करण्यात आल्यानंतर दुपारनंतर शिक्षण मंडळातील काम पूर्वपदावर आले.
कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनातील वरिष्ठांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळ दहावी आणि बारावी परीक्षांचा बोर्डाचा निकाल जाहीर करण्यास येत असणाऱ्या अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत.
शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बंद पुकारल्याने निकालाचे राहिलेल्या कामावर परिणाम झाला होता. आता मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतल्याने बारावीच्या निकालाची तारीख लवकरच जाहीर होऊ शकते. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर करण्यात आला होता.
बदली, बढतीच्या नियमांतील बदलांमुळे आंदोलन
छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध विभागीय मंडळातील कर्मचाऱ्यांचे २० एप्रिलपासून काळ्याफिती लावून आंदोलन सुरू होते. २८ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलनाला कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली. राज्य मंडळाने बदली, बढतीच्या नियमांत केलेल्या बदलामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते.
चर्चेनंतर आंदोलन मागे
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्य मंडळाचे महत्वाचे निकालाचे कामकाज ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान शिक्षण आयुक्तांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.
मंडळाचे कामकाज पुन्हा सुरू
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, कृती समितीच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनाबाबत शिक्षण आयुक्त यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग घेतली. मंडळ कर्मचारी बढती व बदल्या बाबतचा १२ फेब्रुवारीचा कार्यकारी परिषदेतील विषय क्रमांक ९६ ने घेतलेला निर्णय रद्द करणे व रिक्त असलेल्या कनिष्ठ लिपिक पदांची भरती प्रक्रिया राबविणे या मागण्याबाबत सकारात्मकता दर्शवली. यामुळे बेमुदत कामबंद आंदोलन २९ मध्यान्हपूर्व पासून तूर्तास स्थगित करण्यात येत आहे. सर्व कृती समिती सदस्य कर्मचाऱ्यांनी कार्यालयातील नियमित हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करून दैनंदिन कामास सुरुवात करावी. यानंतर कर्मचाऱ्यांनी विभागीय मंडळातील कामकाज सुरू झाले.
छत्रपती संभाजीनगर विभागाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, बीड, जालना अशी पाच जिल्हे येतात. विभागात छत्रपती संभाजीनगर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सी. पी. सिंगल, सचिव विष्णू चव्हाण, संघटन सचिव राजेश शहाणे, बहुजन संघटनेचे अध्यक्ष एस. एस. नेलूरी, सचिव ए. ए. सोनुने आदींचा प्रमुख सहभाग होता.

