ITI Admission online registration 2026 Maharashtra: राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) ऑगस्ट २०२६ सत्राच्या प्रवेश प्रक्रियेला अखेर सुरुवात होणार असून, २१ मेपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने शुक्रवारी यासंदर्भातील प्रवेश सूचना जाहीर केली. यंदाची प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरणे, शुल्क भरणे, कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश निश्चितीची सुविधा याच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना १ जूनपासून व्यवसाय आणि संस्थानिहाय प्राधान्यक्रम (ऑप्शन फॉर्म) भरता येणार आहेत. दहावीची गुणपत्रिका संबंधित शाळांकडून वितरित झाल्यानंतर पुढील सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
Maharashtra Polytechnic Admission 2026: दहावीनंतरच्या पॉलिटेक्निक प्रवेशाचा मुहूर्त ठरला! २० मे पासून नोंदणी सुरू; जाणून घ्या ५ मोठे बदल
प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये, राज्याबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये आणि अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी ५०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
राज्यभरात सरकारी आणि खासगी मिळून एकूण १,००४ आयटीआय संस्था असून, त्यामध्ये एक लाख ५७ हजार ६६४ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्यातील ४१८ सरकारी आयटीआय संस्थांमध्ये ९७ हजार ८८ जागा उपलब्ध आहेत. तर ५८६ खासगी आयटीआय संस्थांमध्ये ६० हजार ५७६ जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत.
राज्यभरात विभागनिहाय उपलब्ध जागा
| विभाग | सरकारी आयटीआय | प्रवेश क्षमता | खासगी आयटीआय | प्रवेश क्षमता | एकूण आयटीआय | एकूण प्रवेश क्षमता |
| अमरावती | ६३ | १७,३०० | ३५ | ३,९२८ | ९८ | २१,२२८ |
| छत्रपती संभाजीनगर | ८१ | १५,८५६ | ६९ | ८,५०४ | १५० | २४,३६० |
| मुंबई | ६७ | १६,१९२ | ३९ | ४,५१२ | १०६ | २०,७०४ |
| नागपूर | ७८ | १४,९९६ | १५८ | १४,१८० | २३६ | २९,१७६ |
| नाशिक | ६८ | १५,२२८ | १५१ | १५,४४० | २१९ | ३०,६६८ |
| पुणे | ६१ | १७,५१६ | १३४ | १४,०१२ | १९५ | ३१,५२८ |
| एकूण | ४१८ | ९७,०८८ | ५८६ | ६०,५७६ | १,००४ | १,५७,६६४ |

