म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : 'विधान परिषदेचा आमचा कठीण पेपर पूर्णपणे सुटला असून आता फक्त सोपा पेपर शिल्लक आहे. फक्त टीकमार्क करायची आहे. तो प्रश्न आम्ही सोडवू आणि मुंबईत अंतिम निर्णय घेऊ,' अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राजधानी दिल्लीत दिली.
राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा अर्थखाते मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केल्याच्या चर्चांवरही फडणवीसांनी मौन सोडले.
सूत्रांच्या माहितीनुसार भाजप १० ते ११, शिवसेना पाच ते सहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) दोन असा सर्वसाधारण फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, शिवसेना (उबाठा) आणि महाआघाडीचे, सध्याच्या विधानसभेतले घटलेले संख्याबळ पाहता विरोधकांच्या हमखास जागांवरही महायुतीचेच उमेदवार निवडून यावेत या दृष्टीने भाजप पावले टाकीत आहे.
तटकरे-गोगावले मुलांसाठी आग्रही
शहा यांच्या काही मिनिटांच्या सूचनेनंतर विधान परिषद जागा वाटपाचा मुद्दा संपल्याचे चित्र स्पष्ट झाले. याचा अंतिम निर्णय आज, गुरुवारी दिवसभरात मुंबईमध्ये तिन्ही पक्षांचे नेते जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे आपापल्या मुलांसाठी कोकणच्या जागेसाठी आग्रही आहेत.तीनच जागांवर तिढा
सध्या तीनच जागांचा प्रश्न शिल्लक आहे, बाकी जागांचा विषय संपलेला आहे, अंतिम निर्णय मुंबईत होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोकण या तीनच जागांसाठीचा तिढा असल्याचे मुख्यमंत्र्यांनीही मान्य केले.राष्ट्रवादी काँग्रेस आमची पुण्याची जागा मागत आहे हे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
राष्ट्रवादीची मागणी एकवरुन तीनवर
मागच्या विधान परिषद निवडणुकीत १७ पैकी सात जागा भाजपने जिंकल्या होत्या. मात्र, दरम्यानच्या काळात राजकीय संख्याबळाची स्थिती प्रचंड प्रमाणात बदलली. परिणामी भाजपने आपल्या संख्याबळानुसार बारा जागांवर लढण्याची तयारी केली. भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या रस्सीखेचित राष्ट्रवादीचीही भर पडली. कालपर्यंत एक जागेसाठी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता ही संख्या तीनपर्यंत वाढवली. आम्ही तीन जागा मागितल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत सांगितले.सुनेत्रा पवारांची अर्थ खात्याची मागणी?
राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा अर्थखाते मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याबाबत विचारले असता, माझ्यापर्यंत अद्याप तरी अशी कोणती मागणी आलेली नाही. ती जेव्हा येईल तेव्हा मी बोलेन असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

