Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Maharashtra Weather: राज्यात हवामानाचा डबल अटॅक, मान्सूनपूर्व पाऊस 18 जिल्ह्यांना झोडपणार! मुंबई-उपनगरांत कशी असेल स्थिती?

Maharashtra Weather: राज्यात हवामानाचा डबल अटॅक, मान्सूनपूर्व पाऊस 18 जिल्ह्यांना झोडपणार! मुंबई-उपनगरांत कशी असेल स्थिती?

मुंबई: राज्यात मान्सूनपूर्व पावसाची हालचाल वाढू लागली असून हवामान विभागाने ३ जूनसाठी अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण १८ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

कुठे काय स्थिती असणार?

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळू शकतात.

पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांसाठी कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी स्थानिक पातळीवर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये अलर्ट नसला तरी काही भागांत पावसाच्या सरी पडू शकतात.

मराठवाड्यात यलो अलर्ट, नांदेडमध्ये हलक्या सरी

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भात मेघगर्जना, खबरदारीचे आवाहन

विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims