Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Management Quota Admission: मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशांवर CET सेलची करडी नजर! महाविद्यालयांमध्ये निरीक्षक अन् CCTV रेकॉर्डिंग बंधनकारक

Management Quota Admission: मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेशांवर CET सेलची करडी नजर! महाविद्यालयांमध्ये निरीक्षक अन् CCTV रेकॉर्डिंग बंधनकारक

. टा. प्रतिनिधी, पुणे : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेत (इन्स्टिट्यूशनल / मॅनेजमेंट कोटा) होणाऱ्या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी 'सीईटी सेल'ने कठोर पावले उचलली असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या संस्थास्तरीय प्रवेशाच्या निवडक खासगी महाविद्यालयांमध्ये निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.

कागदपत्रे पडताळणीपासून जागावाटपापर्यंतची प्रक्रिया 'सीसीटीव्ही'च्या निगराणीखाली ठेवण्यासह त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन किंवा त्रुटी आढळल्यास संबंधित संस्थेवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने वेळोवेळी वृत्तांद्वारे पाठपुरावा केला आहे. त्याचप्रमाणे युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनीही निवेदनांद्वारे सीईटी सेलकडे मागण्या केल्या. त्यानंतर सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी महाविद्यालये, विद्यार्थी आणि पालकांसाठी परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. संस्थात्मक कोटा आणि कॅपच्या फेऱ्यांनंतर रिक्त राहणाऱ्या जागांसाठीची संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिकेतील नियमांनुसारच राबवावी लागणार आहे. ''कॅप' फेऱ्या पूर्णपणे संपल्यानंतरच ही प्रक्रिया सुरू करता येणार असून, उपलब्ध जागांचे वाटप अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार करणे बंधनकारक असेल. विद्यार्थी https://sac.maharashtracet. org/mhcet/submit-ticket, cethelpdesk@ maharashtracet.org किंवा ०७९६९१३४४०१, ०७९६९१३४४०२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात,' असे सरदेसाई यांनी सांगितले.

US Teacher Salary: अमेरिकेत शिक्षकांचा पगार ऐकून थक्क व्हाल! प्राथमिक शिक्षकांना ९५ लाख, तर प्राध्यापकांना २ कोटी; वाचा सविस्तर

पारदर्शकता, निष्पक्षता आणि उत्तरदायित्व राखण्यासाठी निवडक खासगी महाविद्यालयांतील संस्थास्तरीय प्रवेश फेऱ्यांसाठी नजीकच्या शासकीय महाविद्यालयातील प्राचार्य, संचालक किंवा वरिष्ठ प्राध्यापकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. हे निरीक्षक कागदपत्रांची पडताळणी, गुणवत्ता यादी तयार करणे, शुल्क भरणा आणि जागावाटपाच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवतील. दर रोजची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुपालन अहवालही सक्षम प्राधिकरणाकडे सादर करावा लागेल.

संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रियेत विशेषतः कागदपत्र पडताळणी आणि जागावाटपाची खोली किंवा सभागृह सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे. तपासणी, लेखापरीक्षण किंवा तक्रार निवारणाच्या वेळी सक्षम प्राधिकरणाने मागणी केल्यास हे रेकॉर्डिंग महाविद्यालयांना उपलब्ध करून द्यावे लागेल.

महाविद्यालयांनी थेट प्राप्त झालेले अर्ज आणि सीईटी कक्षाकडून मिळालेल्या उमेदवारांच्या यादीचा विचार करून प्रवर्गनिहाय अधिकृत गुणवत्ता याद्या तयार कराव्या लागणार आहेत.

Pavitra Portal: शिक्षक भरतीला अखेर वेग! ११ दिवसांत कागदपत्र पडताळणी अन् नियुक्ती; 'या' जिल्ह्यातील उमेदवारांची निराशा

'एजंटांच्या आमिषांपासून सावध राहा'

केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या पूर्ण होण्यापूर्वीच जागा मिळवून देण्याचा दावा करणारे एजंट, मध्यस्थ किंवा खासगी समुपदेशक यांच्या अवाजवी प्रलोभनांना विद्यार्थी व पालकांनी बळी पडू नये, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सीईटी कक्षाच्या राज्यातील ३६ जिल्हानिहाय विद्यार्थी साहाय्यता केंद्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेश प्रक्रियेत प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या आणि प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थी, पालक किंवा नातेवाइकांची दर रोज नोंद ठेवावी लागणार आहे. ही दैनंदिन माहिती सीईटी सेल; तसेच प्रवेश नियामक प्राधिकरणाला ई-मेलद्वारे पाठवावी लागेल. प्रवेश निश्चित झाल्यानंतर तो तत्काळ अधिकृत कॅप पोर्टलवर नोंदवून सीईटी कक्षाला कळविणेही संस्थांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims