Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Manoj Bajpayee : एsss बिहारी मागच्या दाराने ये!  मनोज बायपेयीला बस ड्रायव्हरनेही मारलेले टोमणे, सांगितला दिल्लीतला प्रसंग

Manoj Bajpayee : एsss बिहारी मागच्या दाराने ये! मनोज बायपेयीला बस ड्रायव्हरनेही मारलेले टोमणे, सांगितला दिल्लीतला प्रसंग

स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटंट' या शोमध्ये स्थलांतरितांबद्दल केलेल्या एका विनोदावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये आता अभिनेता मनोज बाजपेयी सामील झाला आहे.

त्यांच्या मते जर एखादी गोष्ट केवळ विनोदाच्या उद्देशाने केली जात असेल, तर त्यात काहीच गैर नाही. आपण स्वतःवर आणि एकमेकांवर हसायला शिकले पाहिजे, अर्थात ते करताना एकमेकांबद्दल आदरही बाळगला पाहिजे. यावेळी त्यांनी दिल्लीतील एका बस चालकाने त्यांना "ए बिहारी" अशी हाक मारल्याचा एक किस्साही सांगितला. आपला आगामी चित्रपट 'लास्ट मॅन इन टॉवर'च्या प्रमोशनदरम्यान मनोज बाजपेयीने नुकतीच 'आयएएनएस' शी संवाद साधला. त्या शोमधील घटनेबद्दल माहिती मिळताच त्यांनी प्रतिक्रिया दिली की, जोपर्यंत ती गोष्ट विनोदाच्या भावनेतून केली जाते, तोपर्यंत त्यांना त्याबद्दल काहीही अडचण नाही. या शोमध्ये शॅरन वर्मा आणि समय रैना यांनी एकमेकांच्या बॅकग्राउंडवर विनोदी टिप्पणी केली होती.

मनोज बाजपेयी - वाईट वाटून घेऊ नये

मनोज म्हणाले, "आपण स्वतःवर आणि इतरांसोबत हसायला शिकले पाहिजे. कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि कोणालाही वाईट वाटणार नाही, अशा प्रकारे आपल्याला एकमेकांवर हसता आलं पाहिजे. हीच गोष्ट आपण शिकली पाहिजे. आपल्याकडे स्वतःबद्दल विनोदबुद्धी असायला हवी, पण त्यासोबतच आदरही असायला हवा. केवळ स्वतःबद्दलच नाही, तर आपल्यासोबत बसलेल्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या पार्श्वभूमीबद्दलही. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसोबत सहजतेने वावरतात, तेव्हा त्या स्वाभाविकपणे एकमेकांवर हसतात."

दिल्लीतील एका प्रसंगाची आठवण

त्यानंतर अभिनेत्याने दिल्लीतील आपल्या सुरुवातीच्या दिवसांमधील एका प्रसंगाची आठवण सांगितली, ज्यात एका बस ड्रायव्हरने त्याच्याशी उर्मठासारखा संवाद साधला होता. तो पुढे म्हणाला, "मी दिल्लीत होतो तेव्हा 18 वर्षांचा होतो. तो माझा पहिलाच अनुभव असल्याने मी बसमध्ये पुढच्या दरवाज्यातून चढण्याचा प्रयत्न केला; मला तिथल्या नियमांची कल्पना नव्हती. ड्रायव्हरने माझ्याकडे पाहिले आणि ओरडून म्हटले, 'ए बिहारी, मागच्या दरवाज्यातून चढ.' त्याला मी खरोखरच बिहारचा आहे हे माहीत नव्हते. खरंतर प्रत्यक्षात मी तिथलाच आहे. त्याच्या मते, अशी साधी चूक करणारी कोणतीही व्यक्ती बिहारचीच असणार, असे गृहीत धरले जात असे. मला त्याचे वाईट वाटले नाही, कारण एक तर तो बरोबरच होता मी बिहारचाच आहे. दुसरे म्हणजे, माझीही काही चूक नव्हती, कारण मी त्या शहरात नवीन होतो आणि तिथल्या पद्धतींशी पूर्णपणे अपरिचित होतो."

मनोज बाजपेयी - मी वेगवेगळ्या राज्यांतील लोकांशी मैत्री केली.


त्याने पुढे सांगितले, "जेव्हा मी वेगवेगळ्या राज्यांतील लोकांशी मैत्री केली, तेव्हा आम्ही एकमेकांची चेष्टा-मस्करी करायचो आणि हसायचो. आम्हाला कधीच वाईट वाटले नाही किंवा आम्ही कधीच दुखावलो गेलो नाही. पण हो, समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा एखादी व्यक्ती बाहेरून येते आणि तुमच्यासाठी किंवा तुमच्या समाजासाठी त्रासदायक ठरते; तेव्हाच वाद निर्माण होतात. मात्र, त्याआधी आपण एकमेकांवर आणि स्वतःवरही हसता आले पाहिजे. हे एका अत्यंत सुदृढ समाजाचे लक्षण आहे."

समय रैनाच्या 'बिहारी' वादाचे नेमके प्रकरण काय आहे?

शॅरन वर्मा 'इंडियाज गॉट लेटंट 2' च्या एका एपिसोडमध्ये कॉमेडिन म्हणून सहभागी झाली होती. संभाषणादरम्यान, समय रैनाने शॅरनच्या 'बिहारी' पार्श्वभूमीवर एक विनोद केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून शॅरननेही समयच्या 'काश्मिरी' पार्श्वभूमीवर विनोद केला. या दोघांमधील ही शाब्दिक देवाणघेवाण सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. आपल्या या प्रत्युत्तरात शॅरनने काश्मिरी पंडितांच्या स्थलांतराचाही उल्लेख केला. त्यानंतर, ऐतिहासिक शोकांतिका आणि विविध समुदायांशी संबंधित संवेदनशील मुद्दे हे विनोदाचा विषय आहेत का, यावर सोशल मीडियाच्या एका गटाकडून प्रश्न उपस्थित केले गेले.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims