Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Manoj Jarange Patil : विखे पाटलांनी घेतलेली भेट निष्फळ, मनोज जरांगे उद्या भर उन्हात उपोषणाला बसणार

Manoj Jarange Patil : विखे पाटलांनी घेतलेली भेट निष्फळ, मनोज जरांगे उद्या भर उन्हात उपोषणाला बसणार

जालना : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून उपोषणाला बसण्यावर ठाम आहेत. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावेत. तसेच सरकारच्या तपासात सापडलेल्या 54 लाख कुणबी नोंदींना मान्यता देवून तातडीने जात प्रमाणपत्र द्यावे.

तसेच जात प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र देखील द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी आज अंतरवली सराटीत जावून मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जवळपास दोन तास मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. पण यामध्ये त्यांना यश आलं नाही. मनोज जरांगे यांनी उद्या भर उन्हात उपोषणाला बसणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच पाणीदेखील घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

"आज रात्रभर विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी चर्चा करावी. उद्या आंदोलन सुरु झालं म्हणजे काही बॉम्ब टाकणे सुरु झालं नाही. उद्याच्या दिवस येतील ते. आंदोलन उन्हात होणार आणि कठोर आमरण उपोषणच होणार. ते आले, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या तर तो नंतरचा भाग राहीला. आता माघार नाही", अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली आहे.

'हैदराबाद गॅझेटनूसार ६१ हजार जात प्रमाणपत्राचे वाटप'

दरम्यान, "कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे. हैदराबाद गॅझेटच्या आधारे मागील सात आठा महिन्यात मराठवाड्यात ६१ हजार २३० कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत", अशी माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अंतरवाली सराटी येथे जाण्याआधी विखे पाटील यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार प्रसाद लाड हे देखील उपस्थित होते.


विखे पाटील म्हणाले, "न्या. शिंदे समिती स्थापन झाल्यापासून कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. मागील तीन वर्षात मराठवाड्यात ३ लाख २ हजार कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली. त्यात मागील सहा महिन्यांचा म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतरची आकडेवारी पाहिली तर ६१ हजार प्रमाणपत्र दिली गेली आहेत. याबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेतला."

"काही ठिकाणी जात प्रमाणपत्र देण्यात अधिकारी दिरंगाई करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. प्रमाणपत्र वाटपासाठी आपण त्रिस्तरीय समिती नियुक्त केली आहे. या समित्या अधिक सक्रिय करण्याचे तसेच या समितीच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करुन प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. गावोगावी दवंड्या देणे, ग्रामसभांमधून आवाहन करणे आदी पद्धतीने हे काम केले जाईल. आगामी काळात याबाबत एक विशेष मोहिम राबविली जाणार आहे", असेही विखे यांनी सांगितले.

दरम्यान, मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत ४९ हजार ७८ एवढ्या कुणबी नोंदी सापडल्या होत्या. तर कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज करण्यात आलेल्या तीन लाख ८९८ अर्ज पैकी केवळ ४२७ अर्ज नाकारण्यात आलेले आहेत. ३ लाख २५१ कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत तर फक्त २२० अर्जावर निर्णय घेणे बाकी असल्याचा दावा प्रशासनाने या बैठकीत केला आहे.

एसडीएमवर कारवाईचे निर्देश

कन्नड येथील प्रांत अधिकाऱ्याने एका जात प्रमाणपत्राबाबत दिरंगाई केल्याचे समोर आले. मागील वर्षभरापासून तिथे अर्जावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या प्रांत अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले आहेत. काही अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आक्रोश निर्माण होतो आहे, त्याचाही आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावे, असे विभागीय आयुक्तांना सांगण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तालुकानिहाय जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा, असे निर्देशही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims