तेहरान/वॉशिंग्टन: गेल्या २४ तासांत इराणनं अमेरिकेला धक्क्यांवर धक्के दिले आहेत. इराणनं गुड फ्रायडेला अमेरिकेची दोन लढाऊ विमानं पाडली. एफ-१५ ई स्ट्राईक ईगल विमान इराणनं जमीनदोस्त केलं.
यात दोन वैमानिक होते. त्यातील एक वाचला. तर दुसरा अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध अमेरिका आणि इराणच्या सैन्याकडून घेतला जात आहे. अमेरिकन हवाई दलाचं ए-१० वॉरथॉग विमानदेखील इराणनं पाडलं आहे. या विमानाचा वैमानिकही सुरक्षित वाचला.
बेपत्ता झालेल्या वैमानिकाच्या शोधासाठी अमेरिकेनं मोहीम हाती घेतली. या मोहिमेवर असलेल्या दोन एचएच-६० डब्ल्यू. ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरवर इराणच्या सैन्यानं गोळीबार केला. त्यामध्ये हेलिकॉप्टर्सचं मोठं नुकसान झालं. इराणी सैनिकांकडून होत असलेला गोळीबार आणि संभाव्य धोका लक्षात घेता या हेलिकॉप्टर्सनी पळ काढला. एका नव्या आधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर केल्याचा दावा इराणनं केला आहे. इराणच्या आकाशावर आम्ही पूर्णपणे नियंत्रण मिळवल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तो आता खोटा ठरताना दिसत आहे.
२८ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये अमेरिकेला प्रचंड नुकसान सोसावं लागलं आहे. अमेरिकेची अनेक हेलिकॉप्टर्स, विमानं या कालावधीत जमीनदोस्त झाली आहेत. त्यांचं एकूण मूल्य २ बिलियन डॉलर्स म्हणजेच १८ हजार ५९६ कोटी रुपये आहे. इराणनं अमेरिकेची टँकर विमानं, ड्रोन, सहायक विमानंदेखील उद्ध्वस्त केली आहेत. याआधी अशी नामुष्की अमेरिकेवर २००३ मध्ये इराक युद्धात ओढवली होती. तेव्हा अमेरिकेनं इतक्या मोठ्या प्रमाणात विमानं, हेलिकॉप्टर्स गमावली.
इराणच्या मजीद हवाई सुरक्षा यंत्रणेनं गेम फिरवला
इराणनं एफ-१५ ई आणि ए-१० सारख्या विमानांना पाडण्यासाठी मजीद इंफ्रारेड हवाई सुरक्षा यंत्रणेचा वापर केला आहे. ही यंत्रणा २०२१ पासून इराणकडे आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा रडारवर अवलंबून काम करत नाही. या यंत्रणेत पॅसिव्ह इंफ्रारेड डिटेक्शन आणि प्रॉक्सिमिटी फ्यूजचा वापर केला जातो. त्यामुळे ही यंत्रणा कोणताही रडार सिग्नल पाठवत नाही. त्यामुळे अमेरिकन विमानं मजीद यंत्रणेला डिटेक्ट करु शकत नाहीत.
मजीदची रेंज ८ किलोमीटर दूरपर्यंत आहे. ६ किलोमीटर उंचीपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. यातील इंफ्रारेड सेन्सर्स १५ किलोमीटरपर्यंतचे टार्गेट्स पाहू शकतात. या यंत्रणेला काशेफ-९९ फेज्ड-एरे यंत्रणेची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे ट्रॅकिंगची क्षमता ३० किलोमीटरपर्यंत वाढते. एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर नजर ठेवता येते. यात ८ क्षेपणास्त्रं तयार असतात. एफ-३५, एफ-१५ ई आणि ए-१० यासारखी विमानं कमी उंचीवरुन उडतात. त्यामुळे मजीद यंत्रणा त्यांना सहज लक्ष्य करते. एफ-३५ चं गरम इंजिन या विमानासाठी आत्मघाती ठरत आहे.

