Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
MPSC Paper Leak : मोबाईल हरवला, एमपीएससी पेपरफुटीतील ऋतुजा पाटीलचा बनाव, कोर्टात रडू कोसळलं; नकातेने खाडीत फेकलेला लॅपटॉप सापडला

MPSC Paper Leak : मोबाईल हरवला, एमपीएससी पेपरफुटीतील ऋतुजा पाटीलचा बनाव, कोर्टात रडू कोसळलं; नकातेने खाडीत फेकलेला लॅपटॉप सापडला

. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : न्यायालयात हजर केले असता ऋतुजा पाटील हिला रडू कोसळले. आरोपी तपासात सहकार्य करीत नसल्याने समोरासमोर चौकशी करायची असून अजून एक आरोपी फरारी असल्याचे सांगून पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली.

न्यायालयाने सहा आरोपींच्या कोठडीत ७ सप्टेंबरपर्यंत वाढ केली असून ऋतुजा हिची ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

मोबाईल हरवल्याचा बनाव

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या गुन्ह्यातील आरोपींकडून पुरावे नष्ट केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. एमपीएससीचा अधिकारी विश्वेश्वर नकाते याने पेपरफुटीदरम्यान वापरलेला लॅपटॉप खाडीमध्ये फेकला; तर नुकतीच अटक झालेल्या ऋतुजा पाटील हिने मोबाइल हरवल्याचा बनाव केला.

खाडीत फेकलेला लॅपटॉप सापडला

एमपीएससीचे अभिजित लेंडवे आणि कौटिल्य अकादमीचे प्रवीण पाटील यांनी मोबाइल खराब झाल्याचे सांगत नवीन मोबाइल जमा केले. त्यामुळे या गुन्ह्यातील पुरावे मिळविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी ऋतुजा पाटील हिच्यासह इतर सहा आरोपींना बुधवारी सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी विश्वेश्वर नकाते याने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने लॅपटॉप खाडीमध्ये फेकला होता, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. हा लॅपटॉप खाडीतून शोधण्यात आला असून त्यातील डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऋतुजा पाटील तपासात सहकार्य करीत नसून तिचा मोबाइलदेखील जमा करण्यात आला नाही. मोबाइल हरवला असल्याचे ऋतुजा सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रवीण पाटील याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून आर्थिक नोंदीचे दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले.

'पेपर फुटला, तेव्हा अध्यक्ष नव्हतो'

दुसरीकडे, औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीवरून राजीनाम्याची मागणी होत असताना, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी बुधवारी प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली. प्रश्नपत्रिकाफुटीची घटना जानेवारी २०२६ मधील असून, मी १८ फेब्रुवारीला अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि ३ मार्चला प्रत्यक्ष कार्यभार स्वीकारला, असे सांगत भीमनवार यांनी पेपरफुटीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध नसल्याचे सूचित केले. पेपरफुटीप्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी टाळण्यासाठी आयोगाने उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एमपीएससीच्या वतीने घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये आयोगाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भीमनवार यांनी 'एक्स' या समाज माध्यमावरून आपली भूमिका स्पष्ट केली. पेपरफुटीच्या घटनेची आयोगाने गंभीर दखल घेतली असून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims