मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या कर्णधारपदी सिद्धेश लाडची निवड झाल्यानंतर मर्यादित षटकांच्या लढतीसाठी सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यात चुरस असल्याचे दिसत आहे.
मात्र मुश्ताक अली स्पर्धेसाठी सूर्यकुमारची कर्णधारपदी निवड होण्याची चिन्हे दिसत आहेत.
श्रेयस अय्यर हा सध्या भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार आहे. त्याचवेळी सूर्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने वर्ल्ड कप टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद राखले आहे. प्रत्यक्ष स्पर्धेच्यावेळी उपलब्ध असलेल्या खेळाडूंतूनच निवड होईल, असे मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी सांगत आहेत. मात्र बहुदा यातच या प्रश्नाचे उत्तर आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने २०२६-२७च्या मोसमाचा कार्यक्रम जाहीर केला आहे, त्यानुसार मुश्ताक अली राष्ट्रीय टी-२० क्रिकेट स्पर्धेचा प्राथमिक टप्पा १४ ते २६ नोव्हेंबर दरम्यान आहे. त्याचवेळी अंतिम टप्पा ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान जाहीर केला आहे. भारतीय क्रिकेट संघ २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत न्यूझीलंडमध्ये टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर ४ ते १५ नोव्हेंबर दरम्यान प्रतिस्पर्धी संघात वनडे मालिका होईल. सध्याच्या परिस्थितीत श्रेयस या दोन्ही मालिकांच्यावेळी भारतीय संघात असेल. या परिस्थितीत तो मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळण्याची शक्यताच धूसर आहे. त्यामुळे सूर्याकडेच मुंबईचे नेतृत्त्व सोपवले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) दोन्ही खेळाडूंना व्हाइट-बॉल क्रिकेटच्या कर्णधारपदासाठी पर्याय म्हणून पाहत आहे. MCAच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने PTIला सांगितले की, "व्हाइट-बॉल कर्णधारपदासाठी आमच्याकडे श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे दोन्ही पर्याय आहेत. मात्र, अंतिम निर्णय त्यांच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल." यामुळे सध्या MCAने कोणत्याही एका नावावर अंतिम शिक्कामोर्तब केलेले नाही. मात्र, कर्णधारपदाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतीय संघाच्या कर्णधार पदावरून काढल्यावर सूर्या भाऊनेही हार मानले नाहीत. त्याने आपला सराव सुरू ठेवला असून एका मुलाखतीमध्ये बोलताना मला बोलावलं तर मी तयार असल्याचं त्याने सांगितले आहे. त्यामुळे जर सूर्याकडे मुश्ताक अली स्पर्धेत कर्णधारपद देण्यात आले आणि सूर्या धावा बनवण्यात यशस्वी ठरला तर कदाचित निवड समितीला तो निवडीसाठी भाग पाडू शकतो. जर जुना सूर्याभाऊसारखा म्हणजेच ३६० डिग्री स्टाईल त्याने फलंदाजी केली तर नक्कीच त्याची निवड होऊ शकते. टी-२० वर्ल्डकप २०२६ जिंकल्यावर सूर्याचे कर्णधारपद काढून त्याला संघातही ठेवले नव्हते.

