गौरव गुप्ता, मुंबई : सलग दुसऱ्या मोसमात मुंबईला नवा कर्णधार मिळणार आहे. अष्टपैलू शार्दूल ठाकूरऐवजी मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारपदी अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड याची नियुक्ती होणार असल्याची माहिती हाती आली आहे.
गेल्या मोसमात अजिंक्य रहाणेकडून शार्दूल ठाकूर याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती.
'होय, आम्ही २०२६-२७च्या रणजी करंडक मोसमासाठी सिद्धेशला आमचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या मोसमात त्याने चांगली कामगिरी केली आणि तो अनुभवी आहे. शार्दुल आमचा मॅचविनरच आहे. त्याच्यावर आधीच खूप ताण आहे. त्याला खूप षटके गोलंदाजी करावी, विकेट टिपण्याची जबाबदारीही असते शिवाय फलंदाजीतही तो योगदान देतो. यामुळे आम्ही कर्णधारपदाच्या जबाबदारीचा भार त्याच्यावर टाकू इच्छित नाही. शिवाय, आम्हाला त्याच्या कार्यभाराचे नियोजनही करावे लागेल. रणजी करंडक स्पर्धेत १० सामने आहेत आणि त्याला एखाद्या सामन्यासाठी विश्रांती द्यावी लागू शकते,' असे मुंबईच्या वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष राजेश पवार यांनी सोमवारी सांगितले.
संवाद साधूनच निर्णय
'आम्ही सिद्धेश आणि शार्दुल या दोघांशीही याबद्दल बोललो आहोत आणि दोघेही याबद्दल सकारात्मक आहेत. मोसमाची सुरुवात ऑक्टोबरमध्ये रणजी करंडक स्पर्धेच्या चार सामन्यांनी होत असल्याने आम्हाला मुंबईच्या रणजी कर्णधारपदाबाबत आधीच सुस्पष्टता हवी होती, असेही ते म्हणाले. ४२ वेळा रणजी विजेता ठरलेल्या मुंबईची रणजी सलामी ११ ते १४ ऑक्टोबर वानखेडे स्टेडियमवर चंडीगडविरुद्ध होईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यात मुंबईचा संघ आणखी तीन सामने खेळणार आहे.१८-२१ ऑक्टोबर दरम्यान मुंबईचा सामना हिमाचल प्रदेशविरुद्ध प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर होईल. २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर मुंबई हरियाणाविरुद्ध दोन हात करेल. त्यानंतर २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान रेल्वेविरुद्धचा (प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर) सामना होईल. यंदा रणजी करंडकात मुंबईला एलिट गट ड गटात चंडीगड, हरियाणा, हिमाचल, राजस्थान, रेल्वे, तमिळनाडू आणि उत्तराखंडसह स्थान देण्यात आले आहे. गेल्या मोसमात रणजीसह इतर स्पर्धांमध्येही शार्दूल ठाकूर याने मुंबईचे नेतृत्व केले. मोसमात मुंबईला एकही विजेतेपद लाभले नाही.

