मुंबई : सध्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील किशोरवयीन मुलगा जवळपास गेल्या दहा वर्षांपासून बेपत्ता होता. परंतु मालाड पोलीस ठाण्यात अखेर त्याची परिवाराशी पुनर्भेट झाली.
पोलिसांनी तरुणाला रस्त्यावर भीक मागताना पाहिलं. त्याच्या पार्श्वभूमीची सखोल तपासणी करण्याचं ठरवल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
आधी उडवाउडवीची उत्तरं
सध्या २७ वर्षांचा असलेला कमरुद्दीन खान आपल्या आई-वडिलांना पाहताच गहिवरुन गेला. २६ मे रोजी मालाड पोलीस पुनर्वसनासाठी रस्त्यांवरील भिकाऱ्यांना ताब्यात घेण्याची एक नियमित मोहीम राबवत होते. या पथकाला एक तरुण आढळला, ज्याने आपण उत्तर प्रदेशातील 'बस्ती' गावाचा रहिवासी असल्याचे सांगितले. मात्र त्याच्या कुटुंबाविषयी अधिक विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्याला पोलीस ठाण्यात आणून काही खाऊ-पिऊ दिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची पुन्हा चौकशी केली. त्यावेळी तरुणाने आपले नाव कमरुद्दीन असल्याचे सांगितले. आपण साकीनाका येथील एका उर्दू शाळेजवळ राहत असल्याचे तो म्हणाला.
साकीनाक्यात शेजाऱ्यांनी ओळखलं
कमरुद्दीनने वर्णन केलेल्या ठिकाणी पोलिसांचे एक पथक गेले, परंतु त्यांना त्याचे कुटुंब सापडले नाही. त्यांनी स्थानिक रहिवाशांना त्याचे फोटो दाखवले; त्यापैकी दोघांनी त्याला ओळखले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, कमरुद्दीन शाळेत जात असताना आपल्या आई-वडिलांसोबत साकीनाका येथे राहत असे. परंतु दहा वर्षांहून अधिक काळापूर्वी तो परीक्षेत नापास झाला आणि घरातून पळून गेला. त्यानंतर त्याचे कुटुंब मुंब्रा येथे स्थलांतरित झाले होते.स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना कमरुद्दीनच्या मावशीचा फोन नंबर दिला. त्यांच्या माध्यमातून पोलिसांना त्याच्या पालकांशी संवाद साधता आला. बुधवारी मालाड पोलीस ठाण्यात कमरुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांची अत्यंत भावपूर्ण भेट झाली.
डीसीपी संदीप घुगे, वरिष्ठ निरीक्षक दुष्यंत चव्हाण आणि निरीक्षक संजय बेदल यांच्या मार्गदर्शनाखाली, मालाड पोलिसांनी अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत अशा चार व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा एकत्र आणले आहे.
मुंबईतील भिकारी निघालेला मेडिकल विद्यार्थी
यापूर्वी, मुंबई पोलिसांचे एक पथक मालाडच्या एसव्ही रोडवरुन भिकाऱ्यांना ताब्यात घेत असताना कॉन्स्टेबल कोमलसिंग जाधव यांना विशीतील एक तरुण आढळला होता, त्याला साध्या प्रश्नांची उत्तरे देता येत नव्हती, सुसंगतपणे बोलताही येत नव्हते. तो संकटात असल्याचे ओळखून जाधव यांनी त्याला पोलीस ठाण्यात आणलं आणि कोमट पाण्याने आंघोळ घालत, गरम जेवण देऊन शांत केलं. काहीसा सावरल्यानंतर, एका पोलीस उपनिरीक्षकाने त्याच्या भूतकाळाविषयी हळूवारपणे चौकशी करण्यास सुरुवात केली असता तो नांदेड येथील वैद्यकीय विद्यार्थी असल्याचं उघड झालं होतं.

