म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : भांडुपच्या तुळशेतपाडामध्ये एसआरए इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन खाली पडलेल्या एका महिलेचा जीव झाडाच्या फांद्यामध्ये अडकल्याने वाचल्याची घटना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी बचावकार्य करत तिची सुखरूप सुटका केली. बऱ्याच प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला त्यांना खाली उतरवण्यात यश आले. या महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रतीक्षा हिवराळे (२६) असे महिलेचे नाव असून या घटनेमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळली
बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास भांडुप पश्चिम तुळशेतपाडामधील सनशाइन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील प्रतीक्षा हिवराळे या राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन खाली पडल्या आणि झाडाच्या फांदीवर अडकल्या. प्रतीक्षा यांनी इमारतीतून उडी मारल्याचा दावा केला जात आहे, मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.फांदी मांडीत घुसली
याबाबत कॉल प्राप्त झाला होताच, तात्काळ अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले. प्रतीक्षा या सुमारे २० ते २५ फूट उंचीवर होत्या. झाडाच्या फांदीमुळे त्यांचा खाली पडण्याचा वेग रोखला गेला. फांदी त्यांच्या मांडीत घुसल्यामुळे त्या अधांतरी अडकून राहिल्या. मुंबई अग्निशमन दलाने अत्यंत कौशल्याने बचावकार्य राबवून जमिनीपासून सुमारे २० फूट उंचीवरुन त्यांना खाली उतरवले."भांडुप पश्चिम येथील तळमजला अधिक २१ मजले असलेल्या एसआरए इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन या महिलेने सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास उडी मारली. आम्हाला सकाळी ९:३३ वाजता फोन आला आणि आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो. एका झाडामुळे तिचा खाली पडण्याचा वेग मंदावला होता, असे तिथे गेल्यावर आम्हाला आढळले. झाडाची साधारण ५०-६० मिमी जाडीची फांदी तिच्या उजव्या मांडीत घुसली होती, त्यामुळे ती झाडावर, जमिनीपासून सुमारे २० फूट उंचीवर अडकून पडली होती. आमच्या जवानांनी 'अँगस लॅडर'च्या (विशेष शिडीच्या) मदतीने त्या फांदीपर्यंत पोहोचून तिला आधार दिला" अशी माहिती अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
मांडीत घुसलेली फांदी कापली
स्टेशन ऑफिसर व्ही. एस. बंडगर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई अग्निशमन दलाचे पथक 'क्विक रिस्पॉन्स व्हेईकल' घेऊन घटनास्थळी पोहोचले. महिलेला अधिक दुखापत होणार नाही याची काळजी घेत, पथकाने सर्वप्रथम इलेक्ट्रिक सॉच्या साहाय्याने त्यांच्या उजव्या मांडीत घुसलेली फांदी कापली.दरम्यान, जवानांनी कॅनव्हास स्ट्रेचरचा वापर करुन 'स्लिंग'सारखी (झोळीसारखी) व्यवस्था केली आणि इमारतीच्या वरच्या मजल्यांवरुन दोरांच्या साहाय्याने तिला स्थिर धरुन ठेवले. त्यानंतर, त्या महिलेला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. तिला रुग्णालयात नेणे शक्य व्हावे यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी तिच्या मांडीत घुसलेली फांदी दोन्ही बाजूंनी कापली. "वैद्यकीय कारणास्तव आम्ही मांडीत घुसलेले फांदीचे तुकडे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही" असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
बरीच दुखापत झाल्याने महिलेला मुलुंड जनरल हॉस्पिटल येथे दाखल केले. प्रथमोपचार करुन त्यांनी पुढील उपचारांकरता सायन रुग्णालयात नेण्यात आले.
जबाब नोंदवणे बाकी
"झाडावर अडकल्यामुळेच त्या महिलेचा जीव वाचला. झाड उंच असले तरी ते खूप मोठे किंवा दाट फांद्यांचे नव्हते; त्याला फारच कमी फांद्या होत्या" असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. शुद्धीवर असलेल्या या जखमी महिलेला सुरुवातीला अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले, तिथे तिला प्राथमिक उपचार देण्यात आले; त्यानंतर तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी तिला सायन रुग्णालयात हलवण्यात आले."त्या महिलेचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाही आणि कोणताही गुन्हाही दाखल करण्यात आलेला नाही. तिने जीव देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. तिचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. आम्ही तिचा जबाब नंतर नोंदवू" असे भांडुप पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

