Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Mumbai News: मुंबई महापालिकेत 'कॅश फॉर ट्रान्स्फर'चा संशय; भाजप आमदार कोटेचा यांची मुख्य सचिवांकडे तक्रार

Mumbai News: मुंबई महापालिकेत 'कॅश फॉर ट्रान्स्फर'चा संशय; भाजप आमदार कोटेचा यांची मुख्य सचिवांकडे तक्रार

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा एकदा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे चौकशीची लेखी मागणी केली आहे.

अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असून त्यासंदर्भातील 'दरपत्रका'सहित माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणाची खातरजमा करण्यासाठी त्यांनी ५ ऑगस्ट २०२६ रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्याकडे पत्राद्वारे माहिती मागितली होती. मात्र, तब्बल २६ दिवस उलटूनही कोणतीही माहिती न मिळाल्याने ढाकणे यांच्या भूमिकेबाबत आमदार कोटेचा यांनी संशय व्यक्त केला आहे.

याआधी २०२५ मध्ये तत्कालीन आयुक्तांनी १६५ अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. मात्र तक्रारीनंतर ते आदेश रद्द झाले होते. त्यानंतर १५ मे २०२६ रोजी जुन्या प्रस्तावातील सुमारे ५० टक्के अभियंत्यांचा समावेश असलेला नवीन बदली प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याविषयीची माहिती मिळताच मी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना त्याची तक्रार केल्यावर त्यांनी तातडीने तो प्रस्ताव रद्द केला, असे आमदार कोटेचा यांनी सांगितले. हा प्रस्ताव तयार करणाऱ्या अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे ५ ऑगस्ट २०२६ रोजी पत्र लिहून माहिती मागितली. परंतु, पत्राला २६ दिवस उलटूनही उत्तर मिळाले नसून या विलंबामुळे ढाकणे यांच्या भूमिकेबाबत आपला संशय अधिक तीव्र होत असल्याचे आमदार कोटेचा यांनी अधोरेखित केले.

मुख्य सचिवांकडे कारवाईची मागणी

विधानसभा सदस्याने अधिकृतरीत्या मागितलेल्या माहितीला उत्तर देण्यास होत असलेला विलंब हा गंभीर प्रकार असल्याचे नमूद करत कोटेचा यांनी मुख्य सचिवांकडे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच माहिती देण्यास दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims