मुंबई : मुंबईत उच्चभ्रू परिसरात एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका 8 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. एका भरधाव लक्झरी कारने या आठ वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली.
संबंधिक लक्झरी कार एक महिला चालवत होती, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी महिला चालकाला अटक देखील केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तसेच चिमुकल्याच्या मृत्यूच्या घटनेमुळे परिसरात संताप आणि हळहळदेखील व्यक्त होत आहे. या घटनेमुळे मुंबईच्या रस्त्यांवरील सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ही अपघाताची घटना रविवारी (30 ऑगस्ट) दुपारी वांद्रे पश्चिम येथील जिजामाता उद्यानासमोर घडली. आठ वर्षीय चिमुकला अंश गुप्ता हा रस्ता ओलांडत होता. याच वेळेस लक्झरी कार भरधाव वेगाने आली. या कारने अंशला धडक दिली. या घटनेत अंश गुप्ता हा चिमुकला गंभीर जखमी झाला. या अपघाताच्या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांची परिसरात मोठी गर्दी जमा झाली.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अंशला धडक देणारी इनोव्हा क्रिस्टा कार खूप जास्त वेगाने धावत होती. ही गाडी मेघा रावल नावाची महिली चालवत होती. ती प्रचंड वेगाने आणि अत्यंत निष्काळजीपणे गाडी चालवत होती. फक्त एवढेच नाही तर गाडी चालवत असताना ती मोबाईलवर बोलत होती. मेघा रावल हिने मानवी जीवितास धोका होईल, अशा स्वरुपाने गाडी चालवली आणि फोनवर बोलण्याच्या नादात रस्ता ओलांडणाऱ्या अंश गुप्ता याच्या अंगावरुन गाडी नेली.अंश गुप्ता हा चिमुकला या अपघातात गंभीर जखमी झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. तसेच अंशला तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आलं. त्याला हॉली फॅमिली हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी अंशला तपासले असता त्यांनी त्याचा मृत्यू झाला, असं घोषित केलं. यामुळे गुप्ता कुटुंबावर मोठा आघात घडला. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले
या अपघाताच्या घटनेनंतर काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी मोठा गोंधळ उडालेला होता. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी वाहन चालक महिलेला ताब्यात घेतलं. तसेच अपघातग्रस्त कारदेखील ताब्यात घेतली.या घटनेनंतर मृतक अंश गुप्ता याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. पोलिसांकडून या घटनेप्रकरणी सखोल तपास केला जात आहे. पोलिसांनी आरोपी महिला वाचन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करुन अपघात नेमका कोणत्या करणामुळे घडला? याचा शोध घेणार आहेत. या प्रकरणी आता काय-काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं आहे.

