Dailyhunt
Mumbai Police Duty Hours : आठ तास ड्युटीचे 'बारा' वाजले! आता '12 तास काम, 24 तास आराम' संकल्पना आणा, पोलिसांची वाढती मागणी

Mumbai Police Duty Hours : आठ तास ड्युटीचे 'बारा' वाजले! आता '12 तास काम, 24 तास आराम' संकल्पना आणा, पोलिसांची वाढती मागणी

दीपेश मोरे, मुंबई : मुंबई पोलिसांसह देशभरातील पोलिस दलांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या आठ तास ड्युटीच्या ऐतिहासिक आणि सर्वोत्कृष्ट प्रयोगाला आज, ५ मे रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत.

मात्र, या दहा वर्षांच्या कालावधीत आठ तासांचे पुरते बारा वाजले आहेत. करोना काळात २०२० मध्ये कोलमडलेले आठ तासांचे नियोजन अद्यापही सुरळीत झालेले नाही. उलट आता तर आठ तासांऐवजी 'बारा तास ड्युटी आणि २४ तास आराम' या संकल्पनेला पोलिसांची पसंती आहे. त्यामुळे आठ तासांऐवजी आता १२ तास ड्युटीची अधिकृत घोषणा करण्यात यावी असे पोलिसांचे म्हणणे असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावर विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.

ड्युटीचे तास निश्चित करावेत

मुंबईची लोकसंख्या, कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हे नियंत्रण करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण येतो. मुंबई पोलिस दलामध्ये अंमलदारांची संख्या सुमारे ३३ हजार इतकी आहे. यामध्ये महिलांची संख्या पाच हजारांहून अधिक आहे. अनियमित वेळांमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते आणि कुटुंबीयांनादेखील पुरेसा वेळ देता येत नव्हता. यामुळे मुंबई पोलिस दलामध्ये ड्युटीचे तास निश्चित करावेत, अशी मागणी जोर धरू लागली.


त्यावेळी वाहतूक पोलिस दलात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल रवी पाटील यांनी आठ तास ड्युटीची संकल्पना मांडली आणि तसा आराखडा तयार केला. तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या आराखड्याला मंजुरी देत ५ मे, २०१६ पासून मुंबई पोलिस दलामध्ये आठ तास ड्युटीचा प्रयोग राबविण्यास सुरुवात झाली. देवनार पोलिस ठाण्यात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व पोलिस ठाण्यांत पोलिसांना आठ तास ड्युटी करण्यात आली.

करोनाने लावला ब्रेक

सन २०१६ मध्ये सुरू झालेला आठ तासांचा प्रयोग सुमारे साडेतीन वर्षे सुरळीत चालला. मात्र, मार्च २०२० मध्ये आलेल्या करोनामुळे लागलेल्या लॉकडाउनमध्ये या प्रयोगाला ब्रेक लागला. पोलिस ठाण्यातील अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे करून आठ तास ड्युटी शिथिल करण्यात आली. तेव्हापासून मुंबई पोलिसांसाठी पूर्वीप्रमाणेच ड्युटीच्या तासांची अद्यापही निश्चिती नाही.

१२ तास काम, २४ तास आराम

दहा वर्षांत मुंबई पोलिस दलात बरेच बदल झाले असून, अनेक तांत्रिक बदलही झाले आहेत. असे असले तरी मुंबईचे राहणीमान, पोलिसांची जीवनशैली, उपलब्ध मनुष्यबळ आणि प्रवासात जाणारा वेळ पाहता सध्या सर्वांची पसंती १२ तास ड्युटी आणि २४ तास आराम या संकल्पनेला आहे. अनेक पोलिस ठाण्यांतील स्टेशन हाऊस, पीटर ऑपरेटर, पीटर चालक, सीसीटीएनएस स्टाफ, कॉम्बॅट कर्मचारी हे सर्व १२ तास काम करून २४ तास आराम करतात. या वेळापत्रकानुसार काम केल्यास आराम मिळतोच, शिवाय मनुष्यबळही कमी लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत आढावा घेण्यास सुरुवात केली असून, नेमकी अंमलबजावणी कशी करावी याबाबत चाचपणी सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims