मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. त्यातच आता सोशल मीडियावर एका व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्यातून भरधाव वेगाने धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आणि तिच्या धडकेने उडालेला पाण्याचा प्रचंड फवारा असं सगळं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पण गंमत म्हणजे हा फवारा रुळांवर नाही, तर थेट वरच्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांवर जाऊन आदळलेला दिसतो आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून, त्यावर भन्नाट मीम्स आणि तितक्याच गंभीर प्रतिक्रियाही उमटत आहेत.
व्हि़डिओमध्ये नेमकं काय दिसतंय?
सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. काहींनी "वंदे भारतने मोफत कार वॉश केल्या", "रेल्वे की रेन शॉवर सर्व्हिस" अशा मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. तर काहींनी ही घटना हसण्यावारी नेण्यासारखी नसल्याचं सांगत रेल्वे मार्गांवर साचणारं पाणी आणि त्याचा सुरक्षिततेवर होणारा परिणाम याकडेही लक्ष वेधलं.
व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया
दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठल्या ठिकाणचा आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र एका व्हिडिओतील टेक्स्टनुसाही हा व्हिडिओ कांजुर मार्ग स्थानकाजवळचा असल्याचे दिसत आहे. मुसळधार पाऊस, रुळांवर साचलेलं पाणी आणि भरधाव वंदे भारत यांचा हा संगम सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडिओ पावसाळ्यातील पायाभूत सुविधांबाबत अनेक गंभीर प्रश्नही निर्माण करत आहे.

