मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये तर मुसळधार ते अति मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत जनजीवन विस्कळीत झालं आहे.
अनेक ठिकाणी झाड कोसळल्याची घटना घडली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. तर भांडूपमध्ये अक्षरश: रस्ता खचला आहे. रस्ता खचल्याची दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अत्यंत चित्त थरारक अशी ही घटना आहे.
रस्ता खचला तेव्हा रस्त्यावरील एक टेम्पोदेखील खचलेल्या रस्त्यासह खड्ड्यात पडला. रस्ता खचल्यामुळे परिसरातील बांधकामदेखील जमीनदोस्त झालं. यासोबत दोन झाड देखील कोसळत असल्याचं व्हिडीओत बघायला मिळत आहे. भांडूपच्या एलबीएस रोडवर सोनपूर परिसरात ही घटना घडली आहे.
संबंधित परिसरात इमारतीसाठी खोदकाम सुरु होतं. या खोदकामामुळेच रस्ता खचल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दरम्यान, घटनास्थळी मुंबईच्या महापौर रितू तावडे दाखल झाल्या. त्यांच्याकूडन घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. रितू तावडे यांच्याकडून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला जात आहे. खोदकाम सुरु असल्यानेच ही घटना घडल्याचं स्थानिकांनी रितू तावडे यांना सांगितलं आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीविहानी झालेली नाही. या प्रकरणी काही कारवाई केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
मुंबईत ताज हॉटेलच्या बाहेर झाड कोसळलं
मुंबईत कुठे किती पाऊस पडला?
- विक्रोळी 164 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- राम मंदिर परिसरात 148.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- सांताक्रूझ परिसरात 126.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- विद्याविहार परिसरात 102.0 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- वांद्रे परिसरात 72.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- सायन परिसरात 63.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- कुलाबा परिसरात 53.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
- भायखळा परिसरात 34.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

