Dailyhunt
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग दहा पदरीकरणाच्या मार्गावर, वाहतूककोंडीला दिलासा; मात्र टोल वसुलीचा कालावधी वाढणार

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग दहा पदरीकरणाच्या मार्गावर, वाहतूककोंडीला दिलासा; मात्र टोल वसुलीचा कालावधी वाढणार

पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील प्रवासी वाहतूककोंडीमुळे त्रस्त आहेत. वीकेंडला तर गाड्यांच्या मार्गावर रांगा लागतात. त्यात काही महिन्यांपूर्वी महामार्गावर टँकर उलटल्यामुळे 32 तास वाहतूक कोंडी झाली होती.

बऱ्याच काळापासून महामार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव तयार आहे. पण प्रत्यक्षात काम कधी सुरू झालं नाही. आता सततच्या होणाऱ्या वाहतूककोंडीनंतर प्रशासनाला जाग आली असून येत्या पावसाळ्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाला दहा पदरी करण्याचं काम सुरू होणार आहे.

टोल वसुलीचा कालावधी वाढणार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या 94.6 किमी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.2026मध्ये सुरू झालेलं हे काम 2029-30पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या रुंदीकरणाच्या अर्थसहाय्य देण्यासाठी अधिकाऱ्यांनी हायवेवरील टोल वसुलीचा कालावधी 15 वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामुळे 2045 असलेली अंतिम मुदत 2060 होण्याची शक्यता आहे. तसेच, वित्तीय संस्थांकडून निधी उभारण्याचाही प्रस्ताव मांडला आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी कोणतीही तरतूद नाही त्यामुळे MSRDCला स्वतंत्रपणे निधी उभा करावा लागणार आहे.

MSRDCचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी याबद्दल माहिती दिली आहे. तसेच, महामार्गावरील वाहतूक नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी टप्प्या-टप्प्याने काम हाती घेतलं जाणार आहे. या वर्षी काम सुरू झालं तर हा प्रकल्प पुढील 3 वर्षांत पूर्ण होईल असेही त्यांनी सांगितले. आधीपासूनच आवश्यक जमीन उपलब्ध असल्यामुळे 2029 ते 30 पर्यंत महामार्गाचा विस्तार पूर्ण होईल.

एका महिन्यात 'मिसिंग लिंक'

या प्रकल्पासाठी एकूण 14,260 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दररोज अंदाजे 65,000 वाहनं हाताळली जातात. वीकेंडला तर ही संख्या एक लाखावर पोहोचते. तसेच, दरवर्षी 5 ते 6 टक्क्यांनी महामार्गावरील वाहनांची संख्या वाढत आहे. येत्या मे महिन्यात 13 किमी लांब 'मिसिंग लिंक' मार्ग सुरू होणार आहे. हा रस्ता सुद्धा 10 पदरी असून खंडाळा घाटातून जाणारा या मार्गामुळे नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. पण तरीही वाहनांची वाढती संख्या पाहून द्रुतगती मार्गाचंही रुंदीकरण आवश्यक आहे.

नवी मुंबईतील कळंबोलीपासून सुरू होणार हा महामार्ग पुण्यातील किवळेपर्यंत विस्तारलेला आहे. 2002मध्ये महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims