Dailyhunt
Muttiah Muralitharan : स्पिन गोलंदाजीची कला लोप पावतेय, चेंडू वळवण्यास शिकवलेच जात नाही'; मुथय्या मुरलीधरन याचे मोठे विधान

Muttiah Muralitharan : स्पिन गोलंदाजीची कला लोप पावतेय, चेंडू वळवण्यास शिकवलेच जात नाही'; मुथय्या मुरलीधरन याचे मोठे विधान

.टा. क्रीडा प्रतिनिधी, पुणे : फलंदाजांच्या आहारी गेलेली आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धा आणि चौकार षटकारांच्या प्रेमात असणारे प्रेक्षक यांना अनुसरून माजी फिरकी गोलंदाज आणि 'हैदराबाद' संघाच्या फिरकी गोलंदाजांचे प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांनी सूचक विधान केले आहे.

'आयपीएल ही मनोरंजनाचे आहे. इथल्या प्रेक्षकांनाही चौकार, षटकारच भावतात. व्यावसायिक टी-२० लीग एक मोठा व्यवसायच झाला आहे', असे रोखठोक विधान मुरलीधरन यांनी बुधवारी वानखेडे स्टेडियमवरील पत्रकार परिषदेत केले.

जसप्रीत बुमराहचा हरपलेला सूर, जवळपास प्रत्येक आयपीएल लढतीत गोलंदाजांना बसणारा चोप, अशा विषयांना मुरलीधरन यांनी स्पर्श केला. खेळाडू घडवण्याऐवजी प्रेक्षकांचे मनोरंजन कसे होईल, यावर भर दिला जात आहे, असे मुरलीधरन यांना सूचवायचे आहे.

'आयपीएलमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यात समतोल साधणे आता अशक्य आहे, कारण त्यामुळे मनोरंजनात अडथळा येईल. टी-२० क्रिकेटमध्ये मनोरंजन म्हणजे चौकार, षटकारांची आतषबाजी. जगाच्या पाठीवरील सर्व व्यावसायिक लीगमध्ये मनोरंजनाला प्राधान्य आहे', असे मुरलीधरन म्हणाले. फलंदाजांच्या अवाजवी वर्चस्वावर अंकुश ठेवण्यासाठी स्टेडियमची सीमारेषा आणखी मागे न्यावी, असे मत काही माजी खेळाडूंनी व्यक्त केले होते. 'सीमारेषा आणखी मागे नेल्याने बदल होतील, असे मला वाटत नाही; कारण डावाच्या अगदी पहिल्याच चेंडूपासून आक्रमक झालेले फलंदाज हा चेंडू सीमारेषेवरून सहज भिरकावतात. फलंदाज आणि गोलंदाजांना समतोल खेळपट्ट्या दिल्या, तर प्रेक्षकांचा हिरमोड होईल.', अशी टिप्पणी मुरलीधरन आयपीएलच्या मंचावरूनच करतात.

फिरकी गोलंदाजीची कला लोप पावत आहे, अशी खंत ऑफस्पिनचा हा दिग्गज व्यक्त करतो. 'स्पिन गोलंदाजीची कला लोप पावत आहे, कारण तरुण स्पिनर्सना चेंडू वळवण्यास शिकवलेच जात नाही. यामुळे ते सक्षम नाहीत. त्यांच्याकडून फक्त जलद गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो', असे मुरलीधरन यांनी सांगितले. 'लहान वयातच फिरकी गोलंदाजीचे संस्कार झाले, तर गोलंदाजांच्या स्नायूंचीही जडणघडण तशी होते. हे आता होत नसल्याने १९ वर्षांखालील संघांत दर्जेदार फिरकी गोलंदाजांची वानवा आहे. वयाच्या १०, ११ किंवा १२व्या वर्षी चेंडू वळवण्याचा प्रयत्न करा', अशी सूचनाही मुरलीधरन यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims