Dailyhunt
ना प्रवासी, ना रहिवासी; रिकाम्या फ्लॅटमधून 4 तासांत 250 कॅब बुक; 'घोस्ट बुकिंग'नं चालक चक्रावले

ना प्रवासी, ना रहिवासी; रिकाम्या फ्लॅटमधून 4 तासांत 250 कॅब बुक; 'घोस्ट बुकिंग'नं चालक चक्रावले

कॅब बुक करण्यात आल्यानं चालकांनी लोकेशन गाठलं. तिथे जाऊन प्रवाशाला फोन केला. पण प्रतिसाद मिळाला नाही. असा प्रकार थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल २५० कॅब चालकांसोबत घडला. त्यानंतर जिथून बुकिंग झालंय, त्या फ्लॅटबद्दल धक्कादायक माहिती समोर आली.

कॅब बुक करताय?

आरामदायी प्रवासासाठी कॅब बुकिंग आता अगदी सर्वसामान्य बाब झाली आहे. यामुळे खर्च वाढला असला तरीही प्रवास सुखकर झाला आहे. पण दोन दिवसांपूर्वी याच कॅब बुकिंगच्या बाबतीत चक्रावून टाकणारा प्रकार घडला.


२५० चालकांसोबत चक्रावून टाकणारा प्रकार

राजस्थानची राजधानी जयपूरमधील वाटिका रोडवरील गुलमोहर गार्डनमधील एका फ्लॅटमधून कॅब बुकिंगचा सिलसिला सुरु झाला. फ्लॅट नंबर डब्ल्यू-१६६ मधून दुपारी तीन ते संध्याकाळी सातच्या दरम्यान एक, दोन नव्हे, तर तब्बल २५० कॅब बुक झाल्या.


ऍप पाहून चालक लोकेशनवर पोहोचले, पण...

बुकिंग स्वीकारणारे चालक गुलमोहर गार्डन इमारतीच्या जवळ पोहोचले. पण तिथे त्यांना प्रवासी सापडला नाही. उबर ऍपवर दाखवण्यात आलेल्या लोकेशनच्या आधारे अनेक चालकांनी गुलमोहर गार्डन गाठलं. प्रत्येक वेळी पिकअप लोकेशनमध्ये तोच फ्लॅट दिसत होता. पण ड्रॉप लोकेशन वेगवेगळं होतं.


कॅब्स येत होत्या, 'तो' प्रवासी येत नव्हता

इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं दिलेल्या माहितीनुसार, अनेक कॅब्स येत होत्या आणि चालकाशिवाय परत जात होत्या. कॅब ज्या नंबरवरुन बुक झाली, त्या फोनवरुन कॉल केल्यावर समोरुन कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता.


सायबर क्राईम की संघटित गुन्हेगारी?

एकाच ठिकाणावरुन इतक्या मोठ्या प्रमाणात बुकिंग होणं हा विषय साधा नाही. हा प्रकार सायबर गुन्ह्याचा किंवा एखाद्या संघटित फसवणुकीचा असावा, अशी शक्यता तज्ज्ञांनी बोलून दाखवली. फेक अकाऊंट किंवा लोकेशन स्पूफिंगच्या मदतीनं या बुकिंग करण्यात आल्याचा संशय आहे.


कॅब ऍग्रीगेटर कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणेत त्रुटी .

या घटनेमुळे कॅब ऍग्रीगेटर कंपन्यांची यंत्रणा आणि पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर बोगस बुकिंग झाल्यानं कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. या प्रकारामुळे चालकांचा वेळ आणि इंधन वाया गेलं. त्यांना नुकसान सहन करावं लागलं.


तपास व्हावा, सत्य उजेडात यावं; मागणीनं जोर धरला

अनेक कॅब चालक गुलमोहर गार्डन जवळ प्रवाशाची वाट पाहत होते. पण कोणीही आलं नाही. या प्रकरणाचं गांभीर्य पाहता तपासाची मागणी जोर धरु लागली आहे. घोस्ट बुकिंगमागे सायबर फ्रॉड असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims