Dailyhunt
Nanded Crime : शिवसेना कार्यकर्त्याच्या मृत्यू प्रकरणाला प्रेमसंबंधाची किनार, बहिणीची सोयरीक मोडल्याचा राग, भावाने तुरुंगातून काटा काढला

Nanded Crime : शिवसेना कार्यकर्त्याच्या मृत्यू प्रकरणाला प्रेमसंबंधाची किनार, बहिणीची सोयरीक मोडल्याचा राग, भावाने तुरुंगातून काटा काढला

नांदेड : शिवसेना कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणाला प्रेम संबंधाची किनार असल्याचं समोर आलं आहे. बहिणीची सोयरीक मोडल्याचा रागातून कारागृहात असलेल्या भावाने खुनाचा कट रचला. हत्येप्रकरणी मुलीचे वडील आणि भावासह सहा जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंधरा दिवसापूर्वीच त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

काय आहे प्रकरण?

नांदेडमधील श्रीनगर भागात सोमवारी पहाटे झालेल्या सोनू कल्याणकर या तरुणाच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे. बहिणीची सोयरीक मोडल्याचा राग मनात धरुन कारागृहात असलेल्या भावाने कट रचत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तरुणाची हत्या केल्याची तक्रार पीडित कुटुंबानी केली आहे.

15 दिवसांपूर्वी धमकी

मयत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी मुलीचा भाऊ, वडील याच्यासह चार जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी हल्लेखोरानी सोनू कल्याणकर यांना गाठून 'तुझे दिवस भरले आहे, नीट रहा' अशी धमकी दिली होती.

दहा वर्षांपूर्वी अफेअर

मयत सोनू कल्याणकर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा कार्यकर्ता होता. कारागृहात असलेला आरोपी गोलू मंगनाळे याच्या बहिणी सोबत त्याचे दहा ते बारा वर्षापूर्वी प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याच दरम्यान घरच्यांनी मुलीचे दुसरीकडे लग्न ठरवले. काही दिवसानंतर लग्न मोडले. सोनू कल्याणकर याच्यामुळे लग्न मोडल्याचा आरोप करत मुलीच्या कुटुंबियांनी २०२० मध्ये विमानतळ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचेही आता फिर्यादींनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान २०२१ साली मुलीचा भाऊ गोलू मंगळनाळे याने आपल्या काही सहकाऱ्यांसोबत सोनू कल्याणकर याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने गोळीबार देखील केला होता, त्यात तो थोडक्यात बचावला. विशेष म्हणजे गोलू मंगनाळे हा कुख्यात दहशतवादी रिंदा गँगचा सदस्य असून सध्या तो कारागृहात आहे.

सोनूच्या वडिलांची तक्रार

बहिणीची सोयरीक मोडल्याचा रागातून गोलू मंगनाळे याने कट रचून सोनू कल्याणकर याचा खून केला. यात मुलीचे वडील चंद्रविजय मंगनाळे यांचा देखील सहभाग असल्याचे मयताचे वडील अशोक कल्यांणकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंद्रविजय मंगळनाळे, मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे यांच्यासह जीवघेणा हल्ला करणारे रोहित लोट, पियुष शिंदे, अंकुश गंधनवाड, मधू जोगदंड आदी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेच्या काही तासातच पोलिसांनी चारही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान ७० तासात पाच जणांचा खून झाल्याने सर्वसामान्य नांदेडकरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims