Dailyhunt
Nandita Patkar Marriage: अभिनेत्री नंदिता पाटकरच्या आयुष्याची नवीन सुरुवात; नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकरशी बांधली लग्नगाठ

Nandita Patkar Marriage: अभिनेत्री नंदिता पाटकरच्या आयुष्याची नवीन सुरुवात; नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकरशी बांधली लग्नगाठ

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री नंदिता पाटकर सध्या तिच्या व्यावसायिक कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आली आहे.

नंदितानं पुन्हा एकदा आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.. नुकतीच तिनं लग्नगाठ बांधली आहे.

नंदिता पाटकर हिनं नाट्य दिग्दर्शक विपुल महागावकर यांच्याशी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नंदिता आणि विपुल यांच्या लग्नाच्या या फोटोंवर चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत शुभेच्छां दिल्या आहेत.

कोण आहेत नंदिता पाटकरचे पती विपुल महागावकर?

तरुण आणि अभ्यासू दिग्दर्शकांमध्ये आज विपुल महागावकर हे नाव घेतलं जात आहे. 'पै पैशाची गोष्ट' आणि 'उध्वस्त धर्मशाळा' सारख्या दर्जेदार नाटकांच्या माध्यमातून त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विपुल यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक 'बॅकस्टेज आर्टिस्ट' म्हणून केली. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांच्या निमित्तानं त्यांनी नाटकाचे बारकावे समजून घेतले. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, मुळात स्वभावानं अंतर्मुख (Introvert) असल्यानं व्यक्त होण्यासाठी त्यांनी नाटक हे माध्यम निवडलें. त्यांच्या 'ते' या समलैंगिकतेवर आधारित पहिल्या एकांकिकेला राज्यस्तरावर द्वितीय पारितोषिक मिळालं होतं.

तर नंदिताच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर तिच्या अभिनय प्रवासाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांतून. त्यानंतर २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'एलिझाबेथ एकादशी' या चित्रपटानं तिचं आयुष्यच बदलून टाकलं. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं आणि त्यांना फिल्मफेअर मराठी पुरस्कारासाठी नामांकनही मिळालं.त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलं नाही. 'खारी बिस्किट', 'बाबा', 'लालबागची राणी' आणि 'पाणी' यांसारख्या आशयघन चित्रपटांतून तिनं स्वतःची अभिनयक्षमता सिद्ध केली. 'खारी बिस्किट' मधील भूमिकेसाठी त्यांना 'झी चित्र गौरव' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय.

वैयक्तिक आयुष्यावर भाष्य

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नंदितानं एका मुलाखतीत तिच्या पहिल्या लग्नावर भाष्य केलं होतं. काही कारणामुळं हे लग्न टिकू शकलं नव्हतं. यानंतरचा कठिण काळ तिनं सांगितला होता. अभिनय क्षेत्रात आपलं पाऊल टाकलं, त्याच काळात तिचं वैयक्तिक आयुष्य एका वेगळ्या वळणावर आलं होतं. लग्नानंतर काही काळातच ती पतीपासून विभक्त झाली. "घटस्फोट" हा शब्द आजही तिला अस्वस्थ करतो, असं तिनं म्हटलं होतं.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims