Dailyhunt
Nasrapur Case: नसरापूर येथील घटनास्थळ 'सील'; नराधमाभोवतीचा फास आवळण्यासाठी विशेष तपास पथक, कोणा-कोणाचा समावेश?

Nasrapur Case: नसरापूर येथील घटनास्थळ 'सील'; नराधमाभोवतीचा फास आवळण्यासाठी विशेष तपास पथक, कोणा-कोणाचा समावेश?

. टा. प्रतिनिधी, पुणे: भोर तालुक्यातील नसरापूर येथील बालिकेवरील अत्याचार व खून प्रकरणाच्या तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात सहा अधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यात दोन महिला अधिकारी आहेत.

दरम्यान, आरोपीची कोठडी मिळवल्यानंतर पोलिसांनी रविवारी ससून रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी केली. नसरापूर येथील घटनास्थळ 'सील' करण्यात आले असून, अधिकाधिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी (१ मे) उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्य हादरले होते. नागरिकांनी पुणे-सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन केले; तसेच शनिवारी (२ एप्रिल) बंद पाळत निषेध नोंदवला. या प्रकरणात ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध खून, बलात्कार आणि 'पोक्सो' कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. आरोपीला विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी पाच मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान,मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी ठाम भूमिका घेऊन, एकाही राजकीय पुढाऱ्याने सांत्वनासाठी घरी येऊ नये, अशी स्पष्ट विनंती केली आहे. 'जोपर्यंत आमच्या मुलीला न्याय मिळत नाही आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकारण्याने आमच्या घरी येऊ नये. आरोपीला फाशी झाल्यानंतर आम्ही राजकारण्यांना भेटू,' असे पीडितेच्या वडिलांनी नमूद केले.

भोर, नसरापूरला कडकडीत बंद

घृणास्पद कृत्याच्या निषेधार्थ रविवारी भोर व राजगडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. नसरापूर येथे सलग तीन दिवस कडकडीत बंद पाळून नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. भोर तालुका किराणा भुसार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल पवार यांनी 'बंद'चे आवाहन केले. त्यानुसार हॉटेले, कापड इतर व्यवसायिक आदी ४०० दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. राजगड तालुक्यातील सर्व व्यवहारही रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. मुख्य बाजारपेठेमधील सर्व दुकाने दिवसभर बंद राहिली.

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका येथे टायर जाळून आंदोलन करण्यात आले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रवीण ओहाळ आणि नागरिकांनी 'नराधमाला फाशी द्या,' अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. नसरापूरजवळील कापूरव्होळ ग्रामस्थांनी गावदेवीचा उत्सव रविवारी साजर न करता कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी रविवारी नसरापूर येथे पीडितेच्या आजी- आजोबांची भेट घेतली. 'या प्रकरणी जलदगती न्यायालयात दररोज सुनावणीचे आदेश द्यावेत. सर्वोच्च न्यायालयापर्यंतचे निकाल एक महिन्यात लावावेत,' अशी मागणी त्यांनी केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims