म. टा. प्रतिनिधी, नागपूर : 'नागपुरातील पर्यटक श्रीधराचार्य स्वामी महाराज यांच्या समूहासोबत २२ ऑगस्ट रोजी काठमांडूला गेले होते. कथा आणि धार्मिक स्थळांचे दर्शन आटोपून परतीची तयारी सुरू असतानाच नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे रस्ते बंद झाले.
वाहनांची व्यवस्था करून पैसेही दिले होते; मात्र मार्गच बंद झाल्याने पर्यटकांची अडचण वाढली. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवासारखे धावून आले आणि आम्ही सुखरूप नागपुरात पोहोचलो', अशी भावना रविवारी पहाटे परतलेल्या पर्यटकांनी व्यक्त केली.
तिबेटला लागून असलेल्या मध्य नेपाळमधील दोन जिल्ह्यांत २६ ऑगस्ट रोजी पहाटे आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले. नदीकाठच्या वस्त्यांमध्ये विध्वंस झाला, तर अनेकांचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर नागपुरातील १०६ पर्यटकांचा परतीचा मार्ग बंद झाला. पुढे काय करायचे, हा प्रश्न निर्माण झाला होता. पैसेही संपत आले होते. या वेळी समूहातील सुनंदा गावंडे यांनी आमदार प्रवीण दटके यांच्याशी संपर्क साधला. दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली.
यानंतर मुख्यमंत्र्यांनी पर्यटकांशी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधून धीर दिला. स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांना मदतीसाठी पाठविण्यात आले. पर्यटकांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या मध्यस्थीने परतीची व्यवस्था झाल्यानंतर त्यांना बसने दानापूरपर्यंत आणण्यात आले. तेथून रेल्वेने नागपूरकडे रवाना करण्यात आले.
'शनिवारी सकाळी ७.३० वाजता आम्ही पटण्याहून ट्रेनने निघालो आणि रविवारी पहाटे ४.३० वाजता सुखरूप नागपुरात पोहोचलो', असे श्रीधराचार्य स्वामी महाराज यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. चार पर्यटक शुक्रवारीच नागपुरात परतले होते.
ज्येष्ठ महिलेवर काठमांडूत उपचार
या धार्मिक पर्यटनादरम्यान नरेंद्रनगर येथील निर्मला पांडे यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यांना तातडीने काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीमुळे त्यांना परत आणणे शक्य नसल्याने त्यांच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत. त्यांचा नातू विमानाने काठमांडूला पोहोचला असल्याचे श्रीधराचार्य स्वामी महाराज यांनी सांगितले.

