म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवर अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नातील संशयित निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेला छत्रपती संभाजीनगरातील 'एमआयएम'चा नगरसेवक संशयित मतिन पटेलच्या चौकशीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
'हनिफभाई, आज-कल काम में नहीं आते...', असे संवाद मतिन पटेलच्या 'कॉल रेकॉर्डिंग'मधून समोर आले आहेत. पटेलच्या मोबाइलमधील पुराव्यांनुसार लवकरच 'मोठे मासे' गळाला लागण्याची चिन्हे आहेत.
मतिन पटेलची आठ तास चौकशी
या प्रकरणी पसार असताना निदा खानला आश्रय दिल्यामुळे 'एमआयएम'चा नगरसेवक मतिन पटेल याला पोलिसांनी सहसंशयित केले. नाशिक पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर २५ मे रोजी पटेल पोलिस आयुक्तालयात हजर झाला होता. त्यावेळी एसआयटीप्रमुख सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी त्याची आठ तास चौकशी केली होती. त्यावेळी पटेलचा मोबाइल जप्त केला.प्रेग्नेंट मेहमान को रखना है
चौकशीतील मुद्द्यांनुसार पटेल याने घरमालक हनिफ शेख याला मोबाइलवरून संपर्क साधून भेटण्यास बोलवले होते. 'हनिफभाई, तुम आज-कल काम में नहीं आते', असे म्हटल्यानंतर हनिफ शेख धावत पटेलकडे आला. 'अरे मतिनभाई, ऐसा नहीं हैं... बोलो ना, क्या काम हैं?', असे हनिफ म्हणाला. त्यावर 'आपके नए मकान पर एक मेहमान को रखना है, वो प्रेग्नेंट है', असे पटेल म्हणाला.हा संवाद पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमधील 'कॉल रेकॉर्डिंग'मधून स्पष्ट झाला असून, हनिफ शेखने पटेलला घराच्या चाव्या दिल्या होत्या. त्यानुसार हनिफलासुद्धा सहसंशयित केले जाण्याची चिन्हे आहेत. तसेच निदा खान हिला पटेलकडे आश्रय देण्यास सांगणाऱ्या व्यक्तिचेही नाव उघड होण्याची शक्यता आहे.
आपलं घर टीव्हीवर का दाखवतायत?
छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांनी 'ऑपरेशन सुरक्षा तपासणी'च्या नावाखाली पटेलला बोलावून घेत कसून चौकशी केली होती. त्यानुसार पटेलने निदा राहत असलेल्या घराचा पत्ता सांगितला होता. ७ मे रोजी पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर याबाबतचे वृत्त सोशल मीडियासह टीव्हीवर प्रसारित झाले. त्यामध्ये निदा राहत असलेल्या घराचाही व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावेळी हनिफच्या पत्नीने 'अपना मकान टीव्ही पर क्यों दिख रहा है', असा प्रश्न हनिफला विचारला. त्यावर हनिफदेखील विचारात पडला. 'यह मकान तो मतिनभाई को किराए पे दिया था, कुछ तो बडा प्रॉब्लेम हुआ होगा', असे म्हणत हनिफने त्याच्या नवीन घराकडे धाव घेतली होती.

