सुरत : २२ वर्षीय कॉम्प्युटर इंजिनिअर निधी पटेल हिच्या हत्येला आठवडा उलटूनही पोलिसांना अद्याप आरोपीची ओळख पटवता आलेली नाही. २४ ऑगस्टच्या सकाळी गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील गोदावडी गावातील तिच्या राहत्या घरी निधीची बॉडी आढळली होती.
फिंगरप्रिंट्स आणि चॅटचा तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा यात सहभाग असल्याचे दर्शवणारा कोणताही ठोस पुरावा त्यांना अद्याप मिळालेला नाही. तपास अधिकारी फिंगरप्रिंट्स, तरुणीचे अलीकडील चॅट्स आणि इतर संभाव्य धागेदोरे तपासत आहेत, परंतु तपासाला अद्याप कोणतीही निश्चित दिशा मिळालेली नाही.मांडवी पोलिसांना तपासात यश न आल्याने, सुरतचे पोलीस अधीक्षक (एसपी) राजेश गढिया यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. मात्र, तपास सुरू होऊन चार दिवस उलटूनही एसआयटीच्या हाती अद्याप कोणताही ठोस दुवा लागलेला नाही.
एसआयटीचे नेतृत्व मांडवी विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी) अक्षेश इंजिनिअर करत आहेत. या तपासकार्यात सुमारे ६० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत.
जबरदस्ती घुसल्याच्या खुणा नाहीत
पोलिसांचा असा संशय आहे की, या हत्येत तरुणीच्या ओळखीच्याच एखाद्या व्यक्तीचा सहभाग असू शकतो, कारण घरात बळजबरीने प्रवेश केल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. घटनेच्या वेळी ती घरी एकटीच होती, कारण तिचे आई-वडील तीर्थयात्रेला गेले होते. ते परतले तेव्हा त्यांना तिचं शव गच्चीवर आढळलं. त्यांच्या घराचा मागील दरवाजा उघडा होता, तर मुख्य दरवाजा आतून बंद होता.शॉर्ट्सची नाडी आणि मोबाईल चार्जरची वायर
तपास अधिकाऱ्यांच्या मते, हल्लेखोराने शॉर्ट्सची नाडी आणि मोबाईल चार्जरची वायर वापरुन तरुणीचा गळा आवळला असावा. तसेच दोन प्लास्टिक पिशव्यांचा वापर करुन तिचा श्वास रोखून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, तिच्या गुप्तांगाच्या भागात जखमा आढळल्या आहेत, ज्यामुळे लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय निर्माण होतो.'बँक ऑफ अमेरिका'च्या उपाध्यक्षाची हत्या
दुसरीकडे, 'बँक ऑफ अमेरिका'च्या उपाध्यक्ष एरिन पियासेंती (वय ३२) यांची न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर परिसरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हल्लेखोर महिला पामेला सिस्नेरोस (वय ४९) हिला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. हल्ल्यातील दुसरा जखमी ६८ वर्षीय पुरुष आहे. त्याची ओळख जाहीर केलेली नाही. पोलिसांनी हल्लेखोराची ओळख क्वीन्स येथील ४९ वर्षीय अशी पटवली आहे.
