Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
निकाल लागून २० दिवस झाले तरी दहावीची ओरिजनल गुणपत्रिका गायब! अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांवर 'हमीपत्र' लिहून देण्याची वेळ

निकाल लागून २० दिवस झाले तरी दहावीची ओरिजनल गुणपत्रिका गायब! अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांवर 'हमीपत्र' लिहून देण्याची वेळ

. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मोठा गाजावाजा करत दहावी-बारावीचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये जाहीर करणाऱ्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालानंतर २० दिवस उलटूनही अद्याप विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका दिलेल्या नाहीत.

गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र एकत्र देण्याच्या अट्टहासापायी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होऊनही विद्यार्थ्यांच्या हाती गुणपत्रिका नसल्याने त्यांना महाविद्यालयांना हमीपत्र लिहून द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका शाळांकडे न आल्याने त्यांना शाळा सोडल्याचा दाखलाही मिळालेला नाही. या गुणपत्रक व दाखल्याअभावी कोणाचेही प्रवेश अडकू नये, यासाठी शिक्षण संचालनालयाने हा हमीपत्राचा तोडगा काढला असला, तरी शासनाच्या दिरंगाईचा भार आम्ही का उचलावा, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

यंदा बारावीचा निकाल २ मे रोजी आणि दहावीचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला. बारावीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडण्यासाठी २५ मे उजाडावा लागला. या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रिया २६ मे पासून सुरू झाल्याने त्यांना दिलासा मिळाला. दहावीच्या विद्यार्थ्यांना मात्र निकाल लागून २० दिवस उलटूनही अद्याप गुणपत्रिका हाती पडल्या नाहीत. या गुणपत्रिका बोर्डाकडून शाळांकडे येतात. शाळा गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र ही कागदपत्रे विद्यार्थ्यांना देते. मात्र यंदा अजूनही गुणपत्रिका न आल्याने अकरावीची पहिली यादी जाहीर होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू होऊनही विद्यार्थी चिंतेत आहेत.

गुणपत्रिकांअभावी विद्यार्थ्यांचे प्रवेश अडकू नये, यासाठी शिक्षण संचालनालयाने सर्व महाविद्यालयांना गुणपत्रक अनिवार्य न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शाळा सोडल्याचा दाखला नसेल, तर गुणपत्रक आणि हा दाखला एकत्र नंतर जमा करू, असे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून लिहून घ्यायचे आहे.

FYJC Mumbai Cutoff: ९०% असूनही झेविअर्स आणि पोदार हुकले! मुंबईतील टॉप २५ कनिष्ठ महाविद्यालयांची पहिली कट ऑफ लिस्ट जारी; येथे तपासा टक्केवारी

याबाबत विद्यार्थी व पालक आणि महाविद्यालयीन स्तरावरही नाराजी आहे. सर्व काही वेळेआधी केल्यासारखे दाखवण्यासाठी शासनाने लवकर निकाल जाहीर केले. पण गुणपत्रकांचे वाटप करण्यास एवढा विलंब का होत आहे, असा प्रश्न मुलुंडमधील एका महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आलेल्या एका पालकांनी उपस्थित केला. दादर परिसरातील एका महाविद्यालयात प्रवेशासाठी आलेले काही विद्यार्थीही याबाबत संभ्रमात होते. महाविद्यालयाने त्यांना असे हमीपत्र लिहून देण्यास सांगितल्यावर त्यांच्यापैकी काहींनी चिंतेने पालकांना फोन लावला. अखेर त्यांनी महाविद्यालयाच्या सूचनेने हमीपत्र लिहून दिले.

11th Admission 2026: अकरावी प्रवेशाचा पहिल्याच दिवशी धमाका! ४९ हजारांहून अधिक प्रवेश पूर्ण; शिक्षण विभागाकडून मुदतवाढ

पश्चिम उपनगरांतील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. पूर्वी ऑनलाइन अर्ज भरतानाच शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत जोडण्याची मुभा होती. मात्र, ही मुभा काढून टाकल्याने आता विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्यावर त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी आम्हाला पाठपुरावा करावा लागणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. विद्यार्थ्याने एकदा प्रवेश घेतला की, अनेकदा त्यांना उर्वरीत कागदपत्रे जमा करण्याचा विसर पडतो. अशा वेळी आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्या विद्यार्थ्यांच्या मागे लागावे लागते, असे घाटकोपर-विद्याविहार भागातील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims