Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Omkar Karve : अचानक मालिकेतून काढलं, आर्थिक तंगीमुळे केली शेती, झालं नुकसान; उदरनिर्वाहासाठी विकली रद्दी, मराठी अभिनेत्यानं सांगितला संघर्ष काळ

Omkar Karve : अचानक मालिकेतून काढलं, आर्थिक तंगीमुळे केली शेती, झालं नुकसान; उदरनिर्वाहासाठी विकली रद्दी, मराठी अभिनेत्यानं सांगितला संघर्ष काळ

मुंबई - मराठी अभिनेता ओमकार कर्वेनं आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, अभिनेत्याचा इंडस्ट्रीतील प्रवास सोपा नव्हता. खडतर प्रवास करत ओमकारनं नाव मिळवलं. काही मालिकेतून अभिनेत्याला अचानक काढण्यात आलं.

स्पष्टवक्तेपणामुळे अभिनेत्याचे निर्मात्यांसोबत वाद झाले. याबद्दल ओमकारनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.

ओमकार कर्वेनं सांगितला संघर्ष काळ

मुलाखतीदरम्यान ओमकार कर्वे म्हणाला की, 'मी 'आभाळमाया', 'अधुरी एक कहाणी', 'चक्रव्ह्यू' या मालिका मी केल्या. माझं कॉलेजचं शेवटचं वर्ष संपलं. आता पुढे काय करायचं? असा विचार माझ्या मनात आला. अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. ऑडिशन्स दिल्या पण, मनासारखं काम मिळत नव्हतं. जे मिळेल ते काम केलं. त्याचदरम्यान, 'खाकी' सिनेमा प्रदर्शित झालेला. त्यांचे असोसिएट गिरीश जोशी त्यावेळी अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीवर आधारित सिनेमा करणार होते. त्या सिनेमाचे दिग्दर्शक रवी करमरकर होते. माझ्याकडे काही काम नव्हतं. मी रवी सरांना विचारलं तुमच्यासोबत काम करू का? मी त्या सिनेमासाठी काम केलं. त्याचदरम्यान रवी सरांनी मला स्मिता ठाकरे यांच्या मालिकेबद्दल सांगितलं. मी मुंबईला येऊन ऑडिशन दिली आणि दोन दिवसांनी माझी निवड झाली. 'वहिनीसाहेब' ही मालिका होती आणि त्या मालिकेत विश्वास किर्लोस्करची भूमिका मी साकारली. तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. त्या मालिकेनं मला खूप काही दिलं. खूप चांगली माणसं दिली.'


'त्यानंतर मी अनेक मालिका, सिनेमे केले. नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर माझ्या आयुष्याला ब्रेक लागला. एक मालिका करत होतो, सगळं छान चालू होतं. पाच-सहा महिने असं काही घडलं की, दिवसच भरत नव्हते. दोन-तीन दिवस फक्त. बाकी कोणते प्रोजेक्ट घेऊ देत नव्हते. माझं घर कसं चालणार? मी काम करायचं कसं? मग चिडचिड व्हायला सुरुवात झाली. स्पष्ट बोलणं बोचतं, तेच झालं. माझा त्यांच्यासोबत वाद झाला. त्या मालिकेतून मला न सांगता काढून टाकलं. जी इथून सुरुवात झाली की, कामच मिळेना. खूप तणावातून मी जात होतो. २०१५ नंतर कुठेच काम मिळत नव्हतं. खूप प्रयत्न केले. शेवटी मी फिल्ड चेंज करण्याचा निर्णय घेतला. काय करावं सुचत नव्हतं.'

अभिनेत्यानं सुरू केली शेती

'त्यादरम्यान, ऑरगॅनिक फार्मिंगची कल्पना डोक्यात आली. माझ्या ओळखीतले आहेत त्यांना सोबत घेतलं. जवळपास तीन महिने मी नाशिकला शेती केली. माझ्याकडे होता-नव्हता तेवढा पैसा सगळा शेतीमध्ये ओतला. खूप छान पीक यायला सुरुवात झाली. ऑर्डर यायला सुरुवात झाली. एक भाजीची ऑर्डर द्यायला गेलो, तेव्हा माझा अपघात झाला. शेतात माझ्यासोबत कामाला माणूस होता त्याला सांगून मी मुंबईत डॉक्टरकडे आलो. डॉक्टरांनी ऑपरेशन करून हातामध्ये प्लेट टाकण्याचा सल्ला दिला. दीड महिन्यांनी काम करू शकतोस, असं डॉक्टरांनी सांगितलं.'

'ऑपरेशन झाल्यानंतर मी नाशिकला गेलो. तिथे जाऊन जे बघितलं ते म्हणजे, जे शेत मी छान पिकवलेलं ते गवतासारखं वाढलेलं, अर्ध जाळलेलं. काम करणाऱ्या माणसाने शेतात काम केलं नाही. आजूबाजूच्या लोकांनी शेत जाळलं. आयुष्यातली जमापुंजी सगळी संपली. आता पुढे काय? त्यातून परत सुरुवात केली. परत हळद, ज्वारी, पिठं विकायला सुरुवात केली. पैसे फार मिळत नव्हते. दोन वेळचं जेवण मिळेल इतकेच पैसे मिळायचे. अचानक लॉकडाऊन लागलं. पैसे संपले. घरात जी काही रद्दी होती, ती विकली त्यातून जे पैसे आले त्याने भाजी आणली. काही नातेवाईकांकडे पैसे मागितले, त्यांनी मदत केली. मित्राचा आंब्याचा व्यवसाय होता, त्यासाठी काम करायला सुरुवात केली. मुंबईमध्ये आंब्याच्या पेट्या विकल्या.'

'माझाच एक मित्र आहे. 'जय मल्हार'च्या वेळी आम्ही एकत्र काम केलेलं. त्याआधी २००९ मध्ये आम्ही काम केलेलं. त्यानंतर गेल्या १-२ वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत काम केलं. सगळं काही छान असेल, असं वाटलेलं. पण तसं नव्हतं. जनावराला किंमत होती, पण तिथे माणसाला किंमत नव्हती. मी याबद्दल फेसबुकवर पोस्ट केलेली. ते त्यांना इतकं लागलं की, त्यांनी मला अचानक मालिकेतून काढून टाकलं. या सगळ्यानंतर मी बाहेर फेकलो गेलो. माझं नाव खराब करण्यात आलं. मी चांगल्या कामाच्या शोधात आहे. मी इंडस्ट्री कधीच सोडली नाहीये. एक स्वतःचं आर्थिक उत्त्पन्न पाहिजे, यासाठी मी व्यवसाय करतोय.' असं ओमकारनं शेवटी सांगितलं. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत ओमकार कर्वे बोलत होता.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims