Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Onion  Buffer Stock : दोन महिन्यांत कांद्याचे दर  २० रुपयांवरुन  ६० रुपये  किलो;बफर स्टॉक असूनही कांदा महाग ,लागवड उत्पादन वाढूनही यंदा टंचाई

Onion Buffer Stock : दोन महिन्यांत कांद्याचे दर २० रुपयांवरुन ६० रुपये किलो;बफर स्टॉक असूनही कांदा महाग ,लागवड उत्पादन वाढूनही यंदा टंचाई

.टा.प्रतिनिधी,नाशिक :मुसळधार पाऊस, उष्णतेतील चढ-उतार आणि पुरवठा साखळीतील तफावतीमुळे दोन महिन्यांत कांद्याचे दर सरासरी २० रुपयांवरून ६० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. सरकारी यंत्रणांनाही कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्यामुळू यंदा उत्पादन वाढूनही बाजारात टंचाई निर्माण झाली आहे.

खरिपाचा कांदा बाजारात येईपर्यंत म्हणजे आणखी अडीच-तीन महिने तरी ग्राहकांना कांदा चढ्या दराने खरेदी करावा लागणार आहे.

साडेसहा लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली.

राज्यात रब्बी हंगामात साडेपाच लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड होते. वर्ष २०२५-२६मध्ये त्यात वाढ होऊन सुमारे साडेसहा लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली. देशात अंदाजे ३०७ लाख टन कांदा उत्पादन झाले. देशाची गरज २०४ लाख टन असताना, सुमारे एक कोटी टन कांदा अतिरिक्त होता. मात्र, साठवलेल्या कांद्यापैकी ३५ ते ४० टक्के कांदा अतिउष्णतेमुळे खराब झाल्याचा अंदाज आहे.

देशात पुरेसा कांदा उपलब्ध असतानाही टंचाई

यंदा बांगलादेशला कांदा निर्यात होऊ शकली नाही. मध्य पूर्वेतील युद्धामुळेही निर्यातीत अडचणी आल्या. यामुळे देशात पुरेसा कांदा उपलब्ध असतानाही टंचाई निर्माण होऊन साठेबाजीचा संशय बळावला आहे. मार्च-एप्रिल महिन्यात सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर तीनच महिन्यांत साडेचार हजारांवर पोहोचले आहेत.

मध्य प्रदेश, कर्नाटकातही नुकसान

जुलै ते सप्टेंबर या काळात नवीन कांदा बाजारात येत नसल्याने कांद्याचे दर चढेच असतात. सणासुदीमुळे वाढलेली मागणी, हवामानाशी संबंधित अडथळे, पुरवठा साखळीतील हालचाली या बाबींचा कांदा दरावर परिणाम झाला आहे. पाऊस लांबल्याने जुलै महिन्यात खरीप कांदा लागवड अल्प प्रमाणात झाली आहे.

यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन आणखी तीन महिने कांदा दर कमी होण्याची शक्यता धूसर आहे. देशात सुमारे २५ राज्यांत कांदा उत्पादन होत असले, तरी प्रमुख उत्पादक महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांतही कांदा रोपे खराब झाल्याने देशांतर्गत पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

खरेदीची टाळाटाळ नडली

मार्च-एप्रिलमध्ये कांद्याचे दर घसरल्याने केंद्राने नाफेड,'एनसीसीएफ'मार्फत दोन लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी खरेदी दरात वेळोवेळी वाढ करीत १२ रुपयांपासून २१ रुपयांपर्यंत दर वाढवले. मात्र, जून महिन्यापासून कांदा दरात वाढ होत गेल्याने या संस्थांनी १.२१ लाख टन कांदा खरेदी केला.

कांदा खरेदीचे उद्दिष्ट या संस्था गाठू शकल्या नाहीत

दोन लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट या संस्था गाठू शकल्या नाहीत. खरेदी केलेल्या कांद्यापैकी किती खराब झाला, याची आकडेवारी उपलब्ध नाही. सध्या नाफेडकडे ५५ हजार टनांपेक्षा कमी कांद्याचा बफर स्टॉक आहे, तर 'एनसीसीएफ'कडे सुमारे ६२ हजार टनांचा बफर स्टॉक आहे. हा कांदा बाजारात आणून ग्राहकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

महानगरांना सर्वाधिक झळ

कांदा दरवाढीची सर्वाधिक झळ मोठ्या शहरांना बसत आहे. तेथे प्रतिकिलो दर ६० रुपयांवर गेले आहेत. चेन्नई, कोलकात्यात ६० रुपये, दिल्लीत ५५, तर मुंबईतही कांद्याचे दर प्रतिकिलो ५० रुपयांच्या पुढे गेले आहेत. या शहरांमध्ये आता नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार आणि मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून ३५ रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री केला जाणार आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims