Dailyhunt
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर फक्त 72 तासांत संपलं, पण...; वर्षभरानंतर संरक्षण मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर फक्त 72 तासांत संपलं, पण...; वर्षभरानंतर संरक्षण मंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट

वी दिल्ली: गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय नागरिक हकनाक मारले गेल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केले.

यानंतर पाकिस्ताननं पलटवार करण्याचा प्रयत्न केला. पुढील ७२ तास भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष चालला. याच ऑपरेशन सिंदूरबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाशी संबंधित दहशतवाद्यांनी २६ निर्दोष पर्यटकांना संपवलं. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओकेमधून दहशतवाद्यांचे तळ जमीनदोस्त केले. आधी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत भारतीय सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली. या ऑपरेशनला आता वर्ष होत आलं आहे. त्यावेळच्या परिस्थितीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

'ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं दहशतवाद्यांविरोधातील आपली भूमिका आणि कारवायांची व्याप्ती दाखवून दिली. ते ऑपरेशन केवळ ७२ तास चाललं. पण त्यामागे मोठी तयारी होती. गरज पडल्यास भारत दिर्घकाळ चालणाऱ्या लढाईसाठी सज्ज होता,' असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 'जग वेगानं बदलत आहे. अनेक देश आपली ताकद वाढवत आहेत. राष्ट्रीय हितांना आधीपेक्षा जास्त प्राधान्य देत आहेत. जुन्या नियमांच्या आधारित आंतरराष्ट्रीय यंत्रणेवर आता प्रश्न उपस्थित झाले आहेत. संयुक्त राष्ट्रासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था कमकुवत झाल्या आहेत,' असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

'तंत्रज्ञान, पुरवठा साखळी आणि डिजिटल टूल्सचा वापर शस्त्रांच्या रुपात केला जाऊ लागला आहे. त्यामुळे या जगात भारताला अधिक सतर्कपणे पुढे जायला हवं. भारताला आपली सुरक्षा आणि विकासाच्या रणनीतीला नव्या परिस्थितीनुसार आकार द्यावा लागेल,' असं राजनाथ सिंह म्हणाले.

'दहशतवाद हा माणुसकीवरील एक काळा डाग आहे. दहशतवाद म्हणजे केवळ विकृत मानसिकता आहे. हा केवळ सुरक्षेचा मुद्दा नाही. तर मानवी मुल्यांच्या संरक्षणाची लढाई आहे. दहशतवादाला बऱ्याचदा धर्म किंवा एखाद्या हिंसक विचारधारेच्या नावाखाली नैतिक ठरवण्याचे प्रयत्न केले जातात. दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी अशा प्रकारची कव्हर फायरिंग केली जाते,' असं सिंह यांनी म्हटलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims