Dailyhunt
Pakistan Navy: खोल समुद्रात 6 भारतीयांचा जीव संकटात; पाकिस्तानी नौदल 'काश्मीर'सह पोहोचलं अन् अकल्पित घडलं

Pakistan Navy: खोल समुद्रात 6 भारतीयांचा जीव संकटात; पाकिस्तानी नौदल 'काश्मीर'सह पोहोचलं अन् अकल्पित घडलं

वी दिल्ली: अरबी समुद्रात घडलेल्या घडामोडी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. एक भारतीय जहाज खोल समुद्रात तांत्रिक अडचणींमुळे संकटात सापडलं. या जहाजानं मदतीसाठी 'डिस्ट्रेस कॉल' दिला.

त्यावेळी या जहाजाच्या मदतीला पाकिस्तानी नौदल धावून गेलं. भारतीय जहाजानं मदत मागताच पाकिस्तानी नौदलानं तातडीनं कार्यवाही करत सहाय्य केलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विळ्या भोपळ्याचं जगजाहीर आहे. त्यामुळे खोल समुद्रात पाकिस्ताननं दाखवलेली दर्यादिली चर्चेचा विषय ठरली आहे.

एमव्ही गौतम नावाचं भारतीय जहाज संकटात सापडलं होतं. हे जहाज ओमानहून भारताकडे जात होतं. पण रस्त्यात एक गंभीर तांत्रिक समस्या निर्माण झाली. त्यामुळे जहाज खोल समुद्रात अडकलं. जहाजातील कर्मचार्‍यांनी तांत्रिक अडचण दुरुस्त करण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण त्यात त्यांना अपयश आलं. जहाजावर एकूण सात जण होते. पैकी सहा भारतीय नागरिक होते. तर एक सदस्य इंडोनेशियाचा होता. खोल समुद्रात जहाज बंद पडल्यानं चालकांची टीम संकटात सापडली.

मुंबईतील रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरनं पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत करण्याची विनंती केली. यानंतर पाकिस्तानी नौदल त्यांच्या 'काश्मीर' नावाच्या जहाजासह तातडीनं पोहोचली. पाकिस्तानी मॅरिटाईम सिक्युरिटी एजन्सीनंदेखील या मानवी सहाय्य मिशनमध्ये योगदान दिलं. भारतीय जहाजावरील चालकांच्या टिमला आपत्कालीन मदतीच्या रुपात जेवण आणि वैद्यकीय सहाय्य पुरवण्यात आलं. पाकिस्तानी नौदलानं तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञ मदतीला पाठवले. त्यांनी भारती जहाज स्थिर केलं. त्यांनी तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी मोलाची मदत केली. पाकिस्तानी नौदलानं भारतीय जहाजाला केलेली मदत सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

पाकिस्तानी नौदलानं या प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यातही अरबी समुद्राच्या उत्तर भागात एक व्यापारी जहाज संकटात सापडलं होतं. त्यावेळी त्यांनी मदतीसाठी साद घातली होती. तेव्हा पाकिस्तानी नौदलानं जहाजावरील चालकांच्या चमूची सुखरुप सुटका केली. त्या चमूत १८ जण होते. यामध्ये अनेक परदेशी नागरिकांचा समावेश होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims