Dailyhunt
Palghar Crime : ​नालासोपाऱ्यात भयानक कांड, 14 दिवसांत 6 जणांच्या बॉडी रस्त्यांवर सापडल्या, नेटफ्लिक्स नाही तर रिअल सीरिजने नागरिक भयभीत​

Palghar Crime : ​नालासोपाऱ्यात भयानक कांड, 14 दिवसांत 6 जणांच्या बॉडी रस्त्यांवर सापडल्या, नेटफ्लिक्स नाही तर रिअल सीरिजने नागरिक भयभीत​

मुलकुमार जैन, पालघर: वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात सध्या भीतीचे सावट पसरले असून, गुन्हेगारांनी पोलिसांच्या नाकावर टिच्चून धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या १४ दिवसांत तब्बल ६ मृतदेह सापडल्याने संपूर्ण पालघर जिल्हा हादरून गेला आहे.

मुंबई-अहमदाबाद हायवे लगतच्या निर्जन स्थळांचा वापर आता मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी होत असल्याचा प्रकार समोर आल्याने सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे.

कचरा उपसून पाहिला तर..

रविवारी संध्याकाळी विरार फाट्यावरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून सुटलेल्या दुर्गंधीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले. जेव्हा पोलिसांनी कचरा उपसून पाहिला, तेव्हा ४५ ते ५० वयोगटातील एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मांडवी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असला तरी, हा नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात, याचा तपास सुरु आहे.

१४ दिवसांतील घटनांचा थरार

गेल्या दोन आठवड्यात वसई-विरारच्या वेगवेगळ्या भागात सापडलेल्या मृतदेहांच्या मालिकेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे.

धानिवबागमध्ये अवघ्या ६ वर्षांच्या चिमुकलीचा विहिरीत मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. तर पेल्हार फाट्यावर एका व्यक्तीचा शिरच्छेद करून त्याची क्रूर हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. नालासोपारामध्ये डी-मार्ट सारख्या वर्दळीच्या परिसरातील नाल्यात महिलेचा मृतदेह आढळला. तर फूलपाडा व विरार फाटा येथेही अज्ञात पुरुषांचे मृतदेह मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हायवेवर गुन्हेगारांचं साम्राज्य?

मुंबई-अहमदाबाद हायवेवरील सूनसान जागा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव गुन्हेगारांसाठी एक संधी ठरतो आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन मृतदेह या ठिकाणी फेकले जात असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. "आमच्या घराबाहेर पडतानाही आता भीती वाटते, पोलिसांचा धाक उरला आहे की नाही?" असा संतप्त सवाल स्थानिक विचारत आहेत.

पोलीस यंत्रणेसमोर आव्हान

एकामागून एक घडणाऱ्या या घटनांमुळे वसई-विरार पोलीस दलासमोर आता तपासाचे मोठे आव्हान आहे. एका बाजूला मृतदेहांची ओळख पटवणे आणि दुसरीकडे हे मृत्यू नेमके कशामुळे झाले, याचा छडा लावणे हे अशा दोन्ही स्तरावर आता पोलिसांना काम करायचे आहे. तसेच हायवेवर गस्त वाढवण्याची आणि सीसीटीव्ही वाढवण्याची मागणीही आता नागरिकांकडून होऊ लागली आहे.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims